गलवान व्हॅलीत चिनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशात तणाव निर्माण झाला. हा तणाव निवळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी लष्करी स्तरावर चर्चा सुरू असून, गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षानंतर देशात वेगवेगळी मतमतांतरे व्यक्त केली जात आहे. सीमेवरील संघर्षानंतर चीनसंदर्भात केंद्र सरकारच्या धोरणांविषयी सी व्होटरनं सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये ७३ टक्के भारतीयांनी मोदी सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या धोरणावर विश्वास दाखवला आहे.

१५ जून रोजी गलवान व्हॅलीत संघर्ष झाला. यात २० भारतीय जवान शहीद झाले. त्यामुळे भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या मुद्यावरून विरोधकांकडून सरकारवर टीकाही केली जात आहे. गलवान व्हॅलीचा मुद्दा चर्चेत असतानाच सी व्होटरनं एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेत भारतीयांना काही प्रश्न विचारण्यात आले होते.

२० जवान शहीद झाल्यानंतर मोदी सरकारनं चीनला उत्तर देण्यासाठी ठोस पावलं टाकली का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ३९ टक्के याला हो असं उत्तर दिलं आहे. २० जवान शहीद झाल्यानंतर मोदी सरकारनं चीनला ठोस उत्तर दिलं, असं त्यांचं म्हणणं आहे. तर ६० ट्क्के लोकांचं उत्तर नाही असं आहे. चीनला अद्याप चोख प्रत्युत्तर मिळालेलं नाही, असं या नागरिकांनी सर्व्हेमध्ये म्हटलं आहे.

सध्या चीनसोबत सीमेवरून सुरू असलेला संघर्ष हाताळण्यात मोदी सरकार सक्षम असून, ७३.६ टक्के भारतीयांनी सरकारवर विश्वास दाखवला आहे. विरोधी पक्षांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास असल्याचं ७३.६ टक्के भारतीयांचं म्हणणं आहे. तर १६.७ टक्के भारतीयांनी हा मुद्दा हाताळण्यात विरोधक सक्षम असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाच म्हणजे ९.६ टक्के लोकांना चीनसोबतचा मुद्दा योग्य पद्धतीनं हातळण्यात मोदी सरकार अथवा विरोधक दोन्ही पात्र नसल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर ७२.६ टक्के लोकांनी मोदींवर विश्वास दाखवला आहे. तर याबाबत १४.४ टक्के लोकांनी राहुल गांधी यांच्यावर विश्वास दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्या तुलना करताना भारतीय नागरिकांचा कल राहुल गांधी यांच्यापेक्षा पंतप्रधान मोदी यांच्याकडे जास्त आहे. ६१ टक्के लोकांनी राहुल गांधींवर अविश्वास दाखवला आहे.