देशामध्ये दिवसोंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढतानाच दिसत आहे. मागील काही दिवसांपासून रोज ५० हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहे. अशातच आता तिरुमला तिरूपती देवस्थानम् मंदिरच्या (टीटीडी) ७४३ कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. मंदिराशी संबंधित तीन जणांना करोनामुळे मृत्यू झाला आहे.

‘तिरुमला तिरुपती देवस्थानम्’चे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली. “११ जून नंतर देवस्थानाशी संबंधित ७४३ कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ४०२ कर्मचाऱ्यांनी करोनावर मात केली असून ते यामधून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर ३३८ जणांवर सध्या वेगवेगळ्या करोना केंद्रांवर उपचार सुरु आहेत,” असं सिंघल यांनी सांगितलं. भक्तांच्या मागणीनुसार मंदिर सुरु करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतल्याचेही यावेळी सिंघल यांनी सांगितलं.

लॉकडाउननंतर ८ जून रोजी पहिल्यांदाच तिरुमला तिरुपती देवस्थान उघडण्यात आलं होतं. सुरुवातीला मंदिर तीन दिवस ‘ट्रायल’ म्हणून उघडण्यात आलं होतं. यादरम्यान व्यवस्थापनाच्या दृष्टीने काय करता येईल याची पाहणी केल्यानंतर ११ जूनपासून मंदिर भक्तांसाठी उघडण्यात आलं. मात्र हे मंदिर उघडण्यात आलं असलं तरी करोना संसर्गामुळे विशेष नियमावली बनवण्यात आली आहे. या नियमांचे पालन करुनच भक्तांना तिरुपतीचे दर्शन घेता येत आहे.

मंदिर सुरु झाल्यानंतर अवघ्या आठवड्याभरामध्येच म्हणजेच १६ जून रोजी मंदिराच्या १४ पुजाऱ्यांना करोनाची बाधा झाली होती. सिंघल यांनीच यासंदर्भातील माहिती त्यावेळी दिली होती. १४ पुजाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर इतर पुजाऱ्यांची एक बैठक घेतली आणि त्यांना आरोग्यविषयक सूचना करण्यात आल्या होत्या. या मंदिरात एकूण ५० पूजारी आहेत. त्यापैकी १४ पुजाऱ्यांना मंदिर सुरु झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच करोनाची बाधा झाल्याचे दिसून आलं. तिरुमला तिरुपती देवस्थानकडून श्री व्यंकटेश्वर मंदिराचा संपूर्ण कारभार चालवला जातो. लॉकडाउनमुळे या मंदिराचं ४०० कोटींचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळेच केंद्र सरकारने जूनच्या पाहिल्या आठवड्यामध्ये नियम शिथिल केल्यानंतर मंदिर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.  २० मार्चपासून बंद असणारे मंदिर ८ जून रोजी म्हणजे जवळजवळ दोन महिन्यानंतर पहिल्यांदा उघडण्यात आलं तेव्हा पहिल्याच दिवशी भाविकांनी तब्बल २५ लाख ७० हजार रुपये दान केले होते. पहिले दोन दिवस फक्त टीटीडी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांसाठी मंदिर उघडण्यात आले होते. तर, तिसऱ्या दिवशी म्हणजे ११ जूनपासून मंदिर स्थानिकांबरोबरच सर्व भक्तांसाठी उघडण्यात आले होते.