भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातील बालकोटमधल्या जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ला केला. हवाई दलाने या एअर स्ट्राइकचे पुरावे केंद्र सरकारकडे सोपवले आहेत. या मिशनसाठी जे बॉम्ब वापरले त्यातील ८० टक्के बॉम्बनी अचूक लक्ष्यावर प्रहार केला असे हवाई दलाने आपल्या अहवालात म्हटले आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

आजही परदेशी प्रसारमाध्यमांनी एअरस्ट्राइकच्या यशस्वीतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यापार्श्वभूमीवर हवाई दलाने सरकारकडे सोपवलेले पुरावे महत्वपूर्ण आहेत. बॉम्ब ठरवलेल्या लक्ष्यावर पडले नाहीत हा दावा खोडून काढण्यासाठी हवाई दलाने एक फाईल तयार केली आहे. या बॉम्ब हल्ल्यामध्ये झाडे आणि जंगलाचा भाग वगळता फार काही नुकसान झाले नाही असा पाकिस्तानचा दावा आहे. जर नुकसान झाले नाही मग पाकिस्तानी फायटर विमानांनी भारतीय हद्दीत घुसून प्रतिहल्ल्याचा प्रयत्न का केला ? असा सवाल हवाई दल प्रमुखांनी विचारला होता.

हवाई दलाने एअर स्ट्राइकसंबंधी तयार केलेल्या १२ पानी अहवालात उपग्रहाच्या मदतीने घेण्यात आलेले हाय रेसोल्युशन फोटो आणि एसएआर रडारच्या सहाय्याने घेण्यात आलेल्या फोटोंचा समावेश आहे. बालकोटचा स्ट्राइक यशस्वी ठरला हे सिद्ध करण्यासाठी ते फोटो मोदी सरकारकडे सुपूर्द केले आहेत असे हवाई दलातील सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंडियन एअर फोर्सच्या मिराज २००० विमानातून इस्त्रायली बनावटीचे स्पाइस २००० बॉम्ब टाकण्यात आले. हे बॉम्ब टार्गेट असलेल्या इमारतीचे छप्पर तोडून आत पडले आणि आतमध्ये त्याचा स्फोट झाला. त्यामुळे जे काही नुकसान झाले ते आतमध्ये झाले आहे असे सूत्रांनी सांगितले.