इराकची राजधानी बगदादजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ८० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये शिया समुदायातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. रस्त्याजवळ असणाऱ्या एका थांब्यावर ट्रकमधील बॉम्बचा स्फोट झाल्यामुळे ही घटना घडली.

बगदादच्या दक्षिणेला असणाऱ्या हिल्ला भागात ट्रकचा स्फोट झाला. हा भाग बगदाद शहरापासून १-०० किलोमीटर अंतरावर आहे. मृतांमध्ये शिया समुदायातील भाविकांची संख्या मोठी आहे. अरबेईन या तीर्थयात्रेला गेलेले लोक परतत असताना हा स्फोट झाला. तीर्थयात्रेहून माघारी परतणारे भाविक कार्बलामधील रस्त्याच्या थांब्याजवळ उभे होते. तीर्थयात्रा असल्याने भाविकांची संख्या अतिशय जास्त होती. तेवढ्यात ट्रकमध्ये बॉम्बस्फोट झाल्याने ८० जणांचा मृत्यू झाला. थांब्यावर मोठी गर्दी असल्याने आणि जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जाते आहे.

इसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. या स्फोटात २०० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती इसिसने त्यांच्या पत्रकात दिली आहे. एका वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. दक्षिण बगदाद प्रांताचे सुरक्षा प्रमुख फलाह अल राधी यांनी या हल्ल्यात ८० जणांचा मृत्यू झाल्याची आणि २० जण जखमी झाल्याची माहिती दिली आहे.