बेंगळुरू : कर्नाटक विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पक्षादेश असूनही काँग्रेसचे नऊ आमदार बुधवारी गैरहजर राहिल्याने सत्तारूढ काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीत चिंतेचे सावट आहे. या नऊपैकी रमेश जारकीहोळी, उमेश जी. जाधव, बी. नागेंद्र आणि महेश कुमथळ्ळी हे चौघे १८ जानेवारीच्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसही गैरहजर राहिले होते. जारकीहोळी हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पूर्वीपासूनच जोरात आहे. आमदार जे. एन. गणेश हे स्वपक्षीय आमदाराशी झालेल्या मारहाणीपासून अज्ञातवासात आहेत, तेही फिरकले नाहीत. भाजप आमदारांनी अधिवेशन सुरू होताच राज्यपाल वजुभाई वाला यांच्या अभिभाषणातच गदारोळ केला आणि भाषण अर्ध्यावरच बंद पाडले. सिद्धरामय्या यांनी पुन्हा पक्षादेश काढला असून ६ ते १५ फेब्रुवारीदरम्यान उपस्थिती अनिवार्य असल्याचे नमूद केले आहे.