रशियाच्या मुस्लिमबहुल भागात आज एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलानं ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा देत पोलीस अधिकाऱ्यावर चाकू हल्ला केला. यावेळी पोलिसांनी इशारा दिल्यानंतर स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात तो ठार झाला. या तरुणाने कुकमोर भागातील पोलीस ठाण्याला आग लावण्याचा प्रयत्नही केला.

डेली मेलच्या वृत्तानुसार, हल्लेखोर तरुणाचं नाव विटले अंतीपोव असं आहे. रशियाच्या तपास एजन्सीने सांगितले की, आम्ही या प्रकाराला दहशतवादी घटना माणून तपास करीत आहोत. त्यामुळे याप्रकरणी गुन्हेगारी खटला दाखल करण्यात आला आहे. रशियाची वृत्तसंस्था इंटरफॅक्सने म्हटलं की, हा हल्लेखोर ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा देत होता. त्याने पोलिसांवर हल्ला करताना त्यांना काफीर संबोधले होते. ही घटना मुस्लिम बहुल टटारस्तान येथे घडली.

पोलीस ठाण्याला आग लावण्याचा केला प्रयत्न

तपास अधिकाऱ्यांनी म्हटलं की, पोलीस इमारतीला आग लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला पकडताना एका पोलिसावर त्याने चाकू हल्ला केला. तो म्हणत होता की, मी तुम्हाला सर्वांना मारण्यासाठी आलो आहे. त्याने पोलीस अधिकाऱ्यावर तीन वेळा चाकूने वार केला. दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला इशारा देताना हवेत गोळीबार केला. मात्र, त्याने ऐकलं नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. जखमी पोलीस अधिकाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे.

हल्लेखोर १६ वर्षीय अंतीपोव हा सायबेरियाच्या अल्टाई भागातला रहिवासी असून तो एका कॅफेमध्ये काम करीत होता. या कॅफेच्या मालकाने बेकायदा शस्त्रनिर्मिती आणि तोडफोडीच्या आरोपांखाली १४ वर्षांची शिक्षा भोगली आहे.