केंद्रीय अन्वेषण विभागाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सचिवालयातील कार्यालयावर छापा टाकल्यानंतर त्यांनी थेट केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर निशाणा साधला. दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (डीडीसीए) चौकशीला अरूण जेटली एवढे का घाबरत आहेत, असा प्रश्न केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला. त्याचबरोबर डीडीसीएच्या घोटाळ्यामध्ये त्यांचा काय संबंध आहे, असाही प्रश्न त्यांनी विचारला.


सीबीआयने मंगळवारी अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयावर छापा टाकला. मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्याविरोधात सीबीआयकडे दाखल असलेल्या गुन्ह्यांसंदर्भात पुरावे गोळा करण्यासाठी हा छापा टाकण्यात आल्याचे स्पष्टीकरण सीबीआयने दिले. या छाप्यांचा केजरीवाल यांच्या कार्यालयाशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, केजरीवाल यांनी विविध प्रश्न उपस्थित करीत हे छापे डीडीसीएच्या फाईलमधील माहिती काढण्यासाठीच टाकण्यात आले होते, असा आरोप केला.
सीबीआयचे अधिकारी माझ्या कार्यालयात डीडीसीएच्या फाईलमधील माहिती वाचत होते. त्यावर काय शेरे मारण्यात आले आहेत, याची माहिती ते घेत होते. ही फाईल घेऊन जाण्याचाच त्यांचा प्रयत्न होता. मात्र, मी या छाप्यांविरोधात आवाज उठवल्यावर त्यांनी ती फाईल नेली नाही. फाईलमधील कागदपत्रांच्या प्रतींची झेरॉक्स त्यांनी घेतली आहे का, याबद्दल मला माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. डीडीसीएच्या कारभारात अनेक गैरप्रकार झाले आहेत. त्याची चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत. यामुळे अरूण जेटली का घाबरले आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.