उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील गजरौला परिसरामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी पडून असलेला एका अज्ञात व्यक्तीचा मुतदेह शेकडो गाड्यांनी चिरडल्याचे उघडकीस आलं आहे. या व्यक्तीचा मृतदेह १२ तास रस्त्याच्या मध्यभागी पडून होता आणि अनेक लहान मोठ्या गाड्या भरधाव वेगाने या मृतदेहाला चिरडून जात होत्या. संपूर्ण प्रकार लक्षात आला तेव्हा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रस्त्यावर पडलेला होता. हा अपघात पंजाबमधून उत्तराखंडला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ९ वर घडला.

१२ तास पडून होता मृतदेह…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग नऊवर शनिवारी रात्री झालेल्या एका अपघातामध्ये अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर हा मृतदेह कोणीही बाजूला काढला नाही. रात्रभर भरधाव वेगातील गाड्या या मृतदेहावरुनच जात होत्या. या भागामध्ये राष्ट्रीय महामार्ग पोलिसांची गाडीही तैनात असते. मात्र या गाडीतील पोलिसांनाही हा मृतदेह दिसला नाही आणि कोणीही पोलिसांना याबद्दल महितीही दिली नाही. त्यामुळेच जवळजवळ १२ तास हा मृतदेह गाड्यांच्या चाकांखाली चिरडला जात होता.

जेव्हा माहिती मिळाली…

सकाळी जेव्हा पोलिसांना या दूर्घटनेची माहिती मिळाली तेव्हा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. यावेळी मृतदेह तुकड्या तुकड्यांमध्ये इतकडे तिकडे पसरलेला अढळून आला. पोलिसांनी फावड्याचा वापर करुन मृतदेहाचे तुकडे गोळा केले. मृतदेहाचे तुकडे शविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. मृतदेहावरील कपड्यांचे तुकडे आणि डॉक्टरांनी केलेल्या प्राथमिक पाहणीमध्ये हा मृतदेह एका पुरुषाचा असल्याचे उघड झालं आहे.

कशी पटवणार ओळख?

गजरौला पोलीस स्थानकाचे अधिकारी जयवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार डीएनए चाचणीच्या मदतीने मृत व्यक्तीची ओळख पटवली जाणार आहे. “शनिवारी रात्री उशीरा झालेल्या अपघातामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मृतदेहाला अनेकदा चिरडलं गेलं आहे. मृतदेहाचे तुकडे गोळा करण्यासाठीही आम्हाला खूप मेहनत करावी लागली. मृतदेहाचे तुकडे गोळा करुन आम्ही शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आम्ही त्याची डीएनए चाचणी करण्याची मागणी करणार आहोत,” असं सिंह यांनी सांगितलं.