तामिळनाडूमध्ये दारूची दुकाने उघडल्यानंतर अवघ्या एका दिवसात १६४ कोटींची दारू विकली गेली. यादरम्यान, मदुराईमध्ये एका व्यक्तीने दुकानाबाहेर दारूच्या बाटलीची पूजा केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्यक्तीने दुकानाच्या पायर्‍यांवर दिवा लावला आणि बाटल्या विकत घेतल्यानंतर त्याची पूजा केली.

तामिळनाडू सरकारने राज्यव्यापी लॉकडाउन २९ जूनपर्यंत वाढविले आहे. दरम्यान, राज्य सरकारने २७ जिल्ह्यांमधील मद्य दुकाने मर्यादित काळासाठी उघडण्यास परवाणगी दिली आहे. शासनाच्या आदेशानंतर दुकाने उघडली तेव्हा सर्व लोक दारू खरेदी करण्यासाठी पोहोचले. यातील एक व्यक्ती दारूची पूजा करताना दिसला.

यावेळी दारूच्या दुकानात हजर असलेल्या काही लोकांनी या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ घेतला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. करोना रोखण्यासाठी लॉकडाउन आणि निर्बंध लागू झाल्यापासून दारूशी संबंधित अनेक विचित्र घटना देशभरात उघडकीस आल्या आहेत. एप्रिलच्या सुरुवातीला दिल्लीत दारू खरेदी करण्यासाठी आलेली वृद्ध महिला चर्चेचा विषय ठरली होती.