बिहारमध्ये सध्या एका पत्राने एका खळबळ माजवली आहे. एका व्यक्तीने बेगुसुराई प्रशासनाला पत्र पाठवत देवाला प्रसन्न करण्यासाठी माणसाचा बळी देण्याची परवानगी मागितली आहे. या व्यक्तीने बळी देणे गुन्हा नसल्याचं सांगत आपण व्यवसायाने इंजिनिअर असणाऱ्या मुलाचा सर्वात आधी बळी देणार असल्याचं सांगितलं आहे.

सुरेंद्र प्रसाद सिंह असं या पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी २९ जानेवारीला बेगुसुराईच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. सोशल मीडियावर पत्राचे स्क्रिनशॉट व्हायरल होत आहेत. मात्र उपविभागीय अधिकारी संजीव कुमार चौधरी असं कोणतंही पत्र मिळालं नसल्याचं सांगितलं आहे.

‘हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. बळी देणं बेकायदेशीर आहे. आम्ही संबंधित व्यक्तीचा शोध घेत असून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल’, अशी माहिती त्यांनी दिली आहे. पत्रावर बिंदू मा मानव कल्याण मानव संस्थेच्या नावाचा उल्लेख असून सिंह आपण या संस्थेचा प्रमुख असल्याचा दावा करत आहे.

सिंह याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो सांगत आहे की, ‘माणसाचा बळी देणं गुन्हा नाही आहे. मला माझ्या देवानेच असं करण्याचा हुकूम दिला आहे. आणि ज्याचा मी सर्वात आधी बळी देणार आहे तो माझा मुलगा आहे. त्याने मंदिरासाठी देणगी देण्यास नकार दिला. तो रावणाप्रमाणे आहे’.

सिंह यांच्या गावातील लोकांनी त्याला वेडा बाबा म्हणून गावात ओळखलं जात असल्याचं सांगितलं आहे. तो विक्षिप्तपणे वागतो. अनेकदा निर्वस्त्र होऊन गावात फिरत असल्याचंही ते बोलले आहेत. त्याने प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा दावा केला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजीही त्यांनी व्यक्त केली आहे.