मुस्लिमांसाठी तो रिझवान होता, पण हिंदूंसाठी तो चमन होता. पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तो एक २४ वर्षीय मानसिक स्थिती योग्य नसलेला तरुण होता. बुधवारी जेव्हा चमन उर्फ रिझवानचा मृत्यू झाला तेव्हा मुरादाबाद जिल्ह्यात एक अनोखी अंत्ययात्रा पहायला मिळाली ज्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम धर्मातील लोक सहभागी झाले होते. या अंत्ययात्रेत हिंदू – मुस्लिम एकता पहायला मिळाली. पण चमन उर्फ रिझवानचा अंत्यविधी कोणत्या धर्माप्रमाणे करायचा ही अडचण मात्र सर्वांसमोर होती. अखेर हिंदू स्मशानभुमीत मुस्लिम धर्माप्रमाणे दफन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दोन्ही बाजूच्या लोकांना आपल्या धर्माप्रमाणे अंत्यविधी व्हावा असं वाटत होतं. अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. तिथे चर्चा केल्यानंतर एक तोडगा काढण्यात आला. हिंदू स्मशानभुमीत मुस्लिम धर्माप्रमाणे मृतदेह दफन करण्याचा निर्णय घेतला गेला आणि विशेष म्हणजे दोन्ही बाजूच्या लोकांनी त्याला सहमती दर्शवली. आजपर्यंत कधीही ऐकलेली किंवा पाहिली नसलेली ही अंत्ययात्रा पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. महत्त्वाचं म्हणजे अंत्ययात्रेदरम्यान ‘राम नाम सत्य है’ आणि ‘अल्लाहू अकबर’ अशा दोन्ही घोषणा दिल्या जात होत्या.

‘राम किशन सैनी यांच्या कुटुंबाने रिझवान उर्फ चमन त्यांच्या हरवलेला मुलगा असल्याचा दावा केला होता. २००९ मध्ये तो हरवला होता. आपल्याला २०१४ मध्ये असलतपुरा परिसरात रस्त्यावर फिरताना तो दिसला होता असंही त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान सुभान अलीच्या कुटुंबियांनी आपण गेल्या पाच वर्षांपासून त्याची काळजी घेत असून आम्हीच त्याचं नाव रिझवान ठेवलं आहे असा दावा केला’, अशी माहिती मुरादाबादचे डीएसपी सुदेश कुमार गुप्ता यांनी दिली.

दोन्ही कुटुंबात झालेल्या वादानंतर पंचायत बोलवण्यात आली होती, जिथे दोन्ही कुटुंब रिझवान उर्फ चमनची काळजी घेतील असा निर्णय घेण्यात आला. महिन्यातील १५ दिवस तो एका कुटुंबाकडे आणि उरलेले १५ दिवस दुस-या कुटुंबाकडे राहिल असंही ठरवण्यात आलं.

‘सैनी यांच्या घरी असताना त्याला फिट आली. पण रुग्णालयात नेण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. दोन्ही कुटुंब मृतदेहाचा हक्क मिळावा म्हणून भांडत होती. अखेर दोन्ही धर्मांचा मान राखत त्यांच्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला’, असं डीएसपी सुदेश कुमार यांनी सांगितलं.