मोर चोरल्याच्या आरोपावरुन मध्यप्रदेशातल्या हिरालाल नावाच्या एका माणसाला मारहाण करण्यात आली. १० जणांच्या जमावाने हिरालाल या माणसाला मारहाण केली. या मारहाणीनंतर हिरालालला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी SC/ST कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून सगळ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातल्या निमचमधील लसूदिया या ठिकाणी ही घटना घडली आहे.

बिहारमधल्या छपरामध्ये शुक्रवारीच तिघांना जनावार चोरीच्या संशयातून मारहाण करण्यात आली. या तिघांचाही या मारहाणीत मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता मध्य प्रदेशातील निमचमध्ये एकाला मोर चोरीच्या आरोपावरून मारहाण करण्यात आली आहे. हिरालाल असं या माणसाचं नाव असून त्याला रुग्णालयात दाखल केलं असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. पोलीस अधिकारी आर के. मिश्रा यांनी ही माहिती दिली असून आम्ही याप्रकरणातल्या १० जणांना अटक केली आहे असेही मिश्रा यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून देशात मॉब लिंचिंगच्या घटना वाढीला लागल्या आहेत. याबाबत एमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी शुक्रवारीच लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. मॉब लिंचिंग विरोधातला कायदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह का आणत नाहीत असा प्रश्न ओवेसी यांनी विचारला होता.