दिल्लीमधील शाहदरा जिल्ह्यातील पोलिसांनी बुधवारी रात्री एका मारुती सुझुकी कारमधून जाणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. गाडी चालवणारा आरोपी कुणाल याने गेल्या दोन दशकांत १०० हून अधिक गाड्यांची चोरी केली आहे. पोलिसांनी घेरलं असतानाही आत्मसमर्पण करण्यास आरोपी तयार नव्हता. त्याने कार रिव्हर्स घेत पोलीस व्हॅनला धडक दिली. या धडकेत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. याचवेळी पोलीस उप-निरीक्षक रोहताश यांना परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात आलं. आरोपी कुणालचा भुतकाळ पाहिला असता त्याने अशा परिस्थितीत पोलिसांवर गोळीबार केला होता.

आरोपी कुणाल कारच्या बाहेर आला आणि त्याने लोखंडी सळईने पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने पिस्तूल बाहेर काढले आणि पोलिसांवर रोखलं. पण पोलीस उप-निरीक्षक रोहताश यांनी त्याच्यावर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने तो खेळण्यातलं पिस्तूल वापरत होता असं रोहताश यांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी आरोपी कुणाल आणि त्याच्या सहकाऱ्याला १०० हून अधिक गाड्यांची चोरीप्रकरणी अटक केली आहे. डीसीपी मेघना यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कुणाल याने अक्षरक्ष: थैमान घातला होता. तो नेहमी रात्री गाड्यांची चोरी करत असे. त्याच्यामुळे पोलिसांची झोप उडाली होती’. कुणालविरोधात २१ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने प्लास्टिक सर्जरी करत आपलं नाव आणि पत्ताही बदलला होता. त्याला अनेक टोपण नावांनी ओळखलं जायचं. भुतनाथ हे त्याचं सध्याचं टोपण नाव होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे. कार चोरी करण्यासाठी आरोपी कुणालला फक्त पाच मिनिटं लागत असत.

आरोपी कुणाल स्टिअरिंग व्हिल लॉकिंग सिस्टम उघडण्यासाठी स्ट्रॉग मॅग्नेटचा वापर करत असेल. तसंच दरवाजा उघडण्यासाठी लोखंडी रॉड आणि गाडीमधील सुरक्षा यंत्रणा भेदण्यासाठी प्री कोडेड इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल वापरत असे. विशेष म्हणजे त्याने युट्यूबवर कारची चोरी कशी करावी याचे व्हिडीओही अपलोड केले होते.

पोलिसांनी काही गाड्या जप्त केल्या असून, रिसिव्हर ट्रॅक करत इतर गाड्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपी चोरी केलेल्या गाड्यांची विक्री करायचा का याचीही माहिती पोलीस घेत आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या कुटुंबाशी संपर्क साधला असता त्याने गुन्हेगारीचा मार्ग निवडला तेव्हाच सर्व संबंध त्यांनी तोडले असल्याचं कळलं होतं.

आरोपी कुणालला काही वर्षांपुर्वी अटक करण्यात आली होती. यावेळी त्याने आपण केलेल्या गुन्ह्यांची लाज वाटते आणि त्यामुळेच आपण जेलमध्ये आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला असल्याचं पत्रात लिहिलं होतं. पण जेलमधून पळून गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याने गाड्यांची चोरी सुरु केली होती.

बुधवारी जेव्हा त्याला अटक करुन पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तेव्हा पोलिसांना त्याच्या मोडस ऑपरेडींचं कुतुहूल वाटत होतं. त्यांनी एका कारचं लॉक खोलून दाखवण्यात सांगितलं असता आरोपीने फक्त चार मिनिटांत करुन दाखवलं अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.