बिहारमधील बक्सर येथील क्वारंटाइन सेंटरला येथील सरकारी अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली. या सरकारी भेटीमागील कारण जरा विचित्र होतं. येथील मांजवरी क्वारंटाइन सेंटरवरील एक २३ वर्षीय तरुण सध्या त्याच्या खाण्याच्या सवयीमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. राजस्थानवरुन बिहारमध्ये परतलेला हा तरुण दिवसाला ४० पोळ्या आणि ८ ते १० प्लेट भात खातो. बरं सकाळ संध्याकाळ असा दोनवेळा त्याला ऐवढे अन्न लागते. मात्र अधिकाऱ्यांना या व्यक्तीबद्दल समजले तेव्हा त्यांच्या या गोष्टीवर विश्वास बसला नाही. म्हणून त्यांनी स्वत: या केंद्राला भेट देऊन खातरजमा करुन घेण्याचा निर्णय घेतला आणि ते थक्क झाले. यासंदर्भातील वृत्त ‘डेक्कन हेराल्ड’ने दिलं आहे.

या तरुणाने नाव अनुप ओझा असं आहे. अनुपच्या खाण्याच्या सवयीबद्दल जाणून घेण्यासाठी अधिकारी दुपारच्या जेवणाच्या वेळी केंद्रावर पोहचले. त्यावेळी अनुप खरोखरच एकावेळी १० जणांना पुरेल इतकं खाणं खात असल्याचं पाहून अधिकारीही चक्रावले. “एक दिवस येथे बिहारमध्ये लोकप्रिय असणारी लिट्टी येथील क्वारंटाइनमधील व्यक्तींसाठी बनवली जात असल्याचे आम्हाला सांगण्यात आलं. (लिट्टी या पुऱ्यांच्या आकाराच्या असतात पण त्यांचे आवरण थोडे जास्त जाड असते) अनुपने एकट्याने ८५ लिट्टी खाल्ल्याचे आम्हाला समजले. एका व्यक्तीसाठी एवढ्या पोळ्या (चपात्या) बनवून आता येथील स्वयंपाकीही कंटाळला आहे. या सर्व तक्रारी मिळाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष येऊन पहाणी करण्याचं ठरवलं,” अशी माहिती प्रभाग विकास अधिकारी ए. के. सिंग यांनी दिली.

ओझामुळेच हे केंद्र सध्या पंचक्रोषीमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या केंद्रावर अगदी थोड्या संख्येमध्ये व्यक्ती असल्या तरी ओझा याच्या अती खाण्याच्या सवयीमुळे केंद्रावर अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. दहा व्यक्तींना पुरेल एवढे अन्न एकच व्यक्ती खात असल्याने हा तुटवडा निर्माण झाल्याचे समजल्यानंतर अधिकारी संभ्रमात पडले आणि त्यांनी स्वत: जाऊन काय प्रकरण आहे हे जाणून घेण्याचा निर्णय घेतला.

“ओझाचे क्वारंटाइनचे दिवस संपत आले आहेत. त्यामुळे त्याला अन्नाची कमी पडता कामा नये असं आम्ही स्वयंपाक्याला सांगितलं आहे. त्याला हवं तेवढं जेवण देण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत,” अशी माहिती या केंद्राच्या व्यवस्थापकाने दिली आहे.