सध्या देशात ‘लव जिहाद’चा मुद्दा चांगलाच तापत असताना, हरियाणामधील एक घटना समोर आली आहे. हिंदू तरुणीशी विवाह करण्यासाठी एका मुस्लीम तरूणाने धर्मांतर केले आहे. शिवाय, या तरूणाने आपले नाव देखील बदलले आहे. या प्रकरणी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने दखल घेतल्यानंतर या तरूणास व त्याच्या पत्नीस आता पोलीस संरक्षण दिले गेले आहे.

हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी मागील आठवड्यातच सांगितले होते की, राज्य सरकारने ‘लव जिहाद’ विरोधात कायदा बनवण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत केली आहे. विवाहासाठी केल्या जाणाऱ्या धर्मांतरास भाजपा नेते ‘लव जिहाद’चं नाव देत आहेत.

यमुनानगरचे पोलीस अधीक्षक कमलदीप गोयल यांनी याबाबत मंगळवारी सांगितले की, २१ वर्षीय तरूण व १९ वर्षीय तरूणीने ९ नोव्हेंबर रोजी हिंदू रितीरिवाजानुसार विवाह केला. तरूणाने धर्माबरोबरच आपले नाव देखील बदलले होते. विवाह केल्यानंतर या दाम्पत्याने उच्च न्यायालय गाठलं व सांगितलं की मुलीच्या कुटुंबापासून त्यांच्या जीवास आणि वैयक्तिक स्वातंत्र्यास धोका आहे. त्यांनी ही देखील विनंती केली की त्यांच्या विवाहास विरोध करणे हे घटनेच्या कलम २१ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचे गंभीर उल्लंघन आहे.

यानंतर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार दोघांनाही सुरक्षा प्रदान करण्यासाठी पोलिसांना त्यांना तेथील सुरक्षा गृहात पाठवले. जिथं ते अनेक दिवसांपासून थांबलेले आहेत. पोलीस अधीक्षकाने सांगितले की, पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांची देखील भेट घेतली व त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. या अगोदर ११ नोव्हेंबर रोजी सुनावणी दरम्यान जेव्हा मुलीच्या कुटुंबियांनी जेव्हा तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा तिने आपल्या कुटुंबीयांना भेटण्यास नकार दिला होता.