कारगिल युद्ध होणार असल्याची गुप्त माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना आधीच देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख अमरजितसिंह दुलत यांनी केला आहे.

गुप्तचर विभागाच्या अपयशामुळेच कारगिलचे युद्ध झाल्याचे आजवर सांगण्यात येत होते. मात्र आता रॉच्या माजी प्रमुखांनीच त्यावर भाष्य केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत.

१९९९ साली कारगिलचे युद्ध झाले, त्यावेळी ए.एस. दुलत हे गुप्तचर विभागात (इंटेलिजन्स ब्यूरो) होते. शनिवारी चंदीगडमध्ये सैन्य साहित्य महोत्सवाला संबोधित करताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. कारगिल युद्धापूर्वी काही संदिग्ध हालचालींची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यावर आमचे मत देऊन आम्ही ही माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवली होती. युद्धापूर्वीच आम्ही अडवाणींना ही माहिती दिली होती, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला निवृत्त लेफ्टनंट जनरल कमल डावर, ‘रॉ’चे माजी प्रमुख के. सी. वर्मा आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल संजीव लंगर उपस्थित होते. या तिघांनीही दुलत यांच्या मताशी सहमती दर्शवत, गुप्त माहिती जास्त काळ तशीच ठेवून चालत नाही; त्यावर त्वरित योग्य कार्यवाही व्हायला हवी, असे सांगितले.

‘जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतात रोज होणाऱ्या मोहिमा केवळ ३० टक्के गुप्त माहितीच्या आधारे होतात. कोणीही संपूर्ण गुप्त माहिती येईपर्यंत थांबू शकत नाही’, असे लंगर यांनी सांगितले. तर ‘प्रत्येक अपयशाचे खापर गुप्तचर यंत्रणांवर फोडून चालणार नाही, हे व्यवस्थेचे अपयश असते’, असे डावर यांनी स्पष्ट केले. देशाच्या व्यवस्थेत सर्व गुप्तचर यंत्रणांची सूत्रे एकाच व्यक्तीच्या हाती असणे आत्मघाती ठरू शकते, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.