कानाखाली मारण्याचा खेळ सहावीतील विद्यार्थ्याच्या जीवावर बेतल्याची घटना पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात घडली आहे. धक्कादायक म्हणजे शाळेच्या मैदानावरच हा खेळ खेळला जात होता. खेळ खेळला जात असताना शिक्षक मैदानात उपस्थित होते. मात्र कोणीही त्यांना खेळण्यापासून रोखलं नाही. विद्यार्थी बेशुद्ध पडल्यानंतर त्याला कोणतीही वैद्यकीय मदत न मिळाल्याने अखेर त्याचा मृत्यू झाला. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात हा खेळ अत्यंत प्रसिद्ध असून, त्यांच्या पारंपारिक खेळांपैकी एक आहे. या खेळाला ‘थप्पड कबड्डी’ तसंच ‘चाटा कबड्डी’देखील म्हटलं जातं.

शाळेत मधली सुट्टी झाल्यानंतर बिलाल आणि आमीर यांनी थप्पड कबड्डी खेळायचं ठरलं. एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी बिलालच्या जोरात कानाखाली बसली होती. त्यांचा हा खेळ पाहण्यासाठी मैदानात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही गर्दी केली होती. ही घटना महिन्याच्या सुरुवातीला घडली असून, सध्या व्हिडीओ व्हायरल होत आहे.

खेळ सुरु होताच दोघांनीही जितक्या जोरात शक्य होईल तितक्या जोरात एकमेकांना कानाखाली मारण्यास सुरुवात केली. पण लवकरच हा खेळ बिलालच्या जीवावर बेतला. आमीरने मारलेली कानाखाली तो सहन करु शकला नाही आणि तिथेच बेशुद्द पडला. यावेळी कोणीही त्याच्या मदतीला धावून आलं नाही.

बिलालला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोलीसदेखील घटनास्थळावर उशिरा पोहोचले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळा प्रशासन बिलालला वेळेत वैद्यकीय उपचार पुरवू शकले नाहीत, त्यामुळे शवविच्छेदन न करणा-या स्थानिक पोलिसांइतकेच तेदेखील जबाबदार आहेत असा आरोप केला जात आहे.