तुम्हाला मोबाइलचे नवे सिम कार्ड घ्यायचे असेल तर आधार कार्ड बंधनकारक होते. मात्र केंद्र सरकारने हा नियम शिथील केला असून आता मोबाइलचे सिम कार्ड घेण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. मोबाइल ऑपरेटर कंपन्या ग्राहकांकडून ओळख पत्र म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा मतदान ओळख पत्र यांचाही स्वीकार करू शकतात असेही केंद्राने स्पष्ट केले आहे. टेलिकॉम सचिव अरूण सुंदराजन यांनी सांगितले आहे की मोबाइल कंपन्यांनी या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी. ग्राहकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून या नव्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्यात आल्याचेही सुंदराजन यांनी स्पष्ट केले.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार सुंदराजन यांनी सांगितले आहे की सगळ्या टेलिकॉम कंपन्यांना आदेश देण्यात आले आहेत की ज्या व्यक्तीकडे आधार कार्ड नाही त्या व्यक्तीलाही सिम कार्ड दिले जावे. फक्त आधार कार्ड नाही हे कारण देऊन ग्राहकाला सिम कार्ड देण्यास मनाई करू नये. केवायसी अर्थात नो युअर कस्टमर चा अर्ज भरून घेताना त्यासोबत ओळखपत्र म्हणून इतरही पर्याय स्वीकारण्यास हरकत नाही असेही कोर्टाने म्हटले आहे.

आधार कार्ड नसल्याने देशातील लोकांना त्रास झालाच मात्र विदेशात राहणाऱ्या एनआरआयनाही त्रास झाला असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक एनआरआय असे आहेत ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही. ते जेव्हा सिम घ्यायला जातात तेव्हा आधार कार्ड अनिवार्य असल्याचे कारण त्यांना दिले जाते. मात्र आता ही अट शिथील करण्यात आली आहे. मोबाइल ऑपरेटर्सकडून या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.