नव्या जागतिक आवृत्तीत भारतातील आणखी २६ शब्दांना स्थान

नवी दिल्ली : इंग्रजी संभाषणातील वापर आणि प्रचलित शब्द या निकषांवर जगभरातील नव्या अर्थपूर्ण शब्दांना सामावून घेणाऱ्या ‘ऑक्सफर्ड लर्नर्स डिक्शनरी’मध्ये आता भारतात बोलल्या जाणाऱ्या आणखी २६ शब्दांना स्थान देण्यात आले आहे.

विशेष म्हणजे यात मराठमोळे डब्बा (जेवणाचा), चाळ (वसती) हे शब्द आणि शादी, हरताळ, आधार (आधार कार्ड) यांचा समावेश आहे.

ऑक्सफर्ड शब्दकोशाची ही अद्यायावत दहावी आवृत्ती शुक्रवारी प्रकाशित करण्यात आली. या आवृत्तीत ३८४ भारतीय (भारतीय इंग्रजी) शब्दांचा समावेश आहे. यावेळी एकूण एक हजार नव्या शब्दांना या कोशाने सामावून घेतले आहे. त्यात चॅटबॉट, फेक न्यूज आणि मायक्रोप्लास्टीक या शब्दांचा समावेश आहे.

‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ने म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून या शब्दकोशाने भाषेतील परिवर्तनावर तसेच तिच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. नव्या आवृत्तीत वापरण्यात आलेली भाषा आणि शाब्दीक उदाहरणे ही बदलत्या काळाशी सुसंगत आणि अद्ययावत असतील, याची दक्षता आम्ही घेतली आहे.

ऑक्सफर्ड लर्नर्स डिक्शनरीचे संकेतस्थळ आणि अ‍ॅप यांच्या माध्यमातून वाचकांशी झालेल्या संवादातून ही नवी आवृत्ती साकारली आहे. या संकतस्थळावर दृकचित्र माध्यमातून स्वाध्याय, संवाद, अभ्यास यांच्याबरोबरच अद्ययावत आय-रायटर आणि आय-स्पीकर साधनांची सुविधा आहे.

नव्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये अंतर्भूत केलेल्या २६ नव्या भारतीय शब्दांपैकी २२ शब्दांना मुद्रित आवृत्तीमध्ये स्थान दिले आहे, अशी माहिती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या शिक्षण विभागाच्या व्यवस्थापकीय संचालिका फातिमा दादा यांनी दिली.

या शब्दकोशातील अन्य भारतीय शब्दांत, आंटि (एयूएनटीआयइ) (आन्टी- एयूएनटीवाय या इंग्रजी शब्दाचे भारतीय रूप),  बस स्टॅन्ड, टय़ूब लाइट, व्हेज आणि व्हिडिओग्राफ यांचा समावेश आहे.

ऑक्सफर्ड शब्दकोशाला ७७ वर्षे होत असून त्याचा श्रीगणेशा १९४२ मध्ये जपानमध्ये झाला. या कोशाचे कर्ते अल्बर्ट सिडने यांचा उद्देश हा जगभरातील भाषा अभ्यासकांना इंग्रजी वापरातील शब्दांचा अर्थ समजावा हा होता.

करंट आणि उपजिल्हा

ऑक्सफर्ड ऑनलाईन आवृत्तीत अर्थाच्या दृष्टीने चार नवे भारतीय-इंग्रजी शब्द समाविष्ट झाले आहेत. यात करंट (वीजप्रवाह या अर्थाने), लूटर, लुटिंग आणि उपजिल्हा या शब्दांचा समावेश आहे.