जमा केलेला तपशील फोडणे मात्र असाध्य असल्याचा दावा

कार्डधारकाच्या बोटांचे ताजे ठसे आणि आधार कार्डावरील ठसे प्रत्येक वेळी एकमेकांशी जुळतातच असे नाही. जैविक ओळखनिश्चितीत आधार शंभर टक्के अचूक नाही, अशी कबुली ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ (यूआयडीएआय)चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर दिली. मात्र आधारसाठी संकलित तपशील फोडण्यासाठी सृष्टीनिर्मितीला जितका वेळ लागला असेल, त्यापेक्षाही अधिक वेळ लागेल, असा टोकाचा दावाही त्यांनी केला.

आधारच्या समर्थनार्थ पांडे यांनी न्यायालयात या कार्डाच्या बलस्थानांचे सादरीकरण केले. त्या वेळी वरील मुद्दा मांडताना ते म्हणाले, कार्डधारकाच्या बोटांचे ताजे ठसे आणि कार्डावरील ठसे यात तफावत असू शकते.

ही बाब सर्वच मंत्रालयांना कळविण्यात आली असून ठसे जुळत नसल्यावरून कोणाचेही अनुदान थांबवू नये, अशी सूचना वारंवार केली गेली आहे. त्यावर, या ओळखनिश्चितीत अपयश आल्याने आजवर किती जणांना लाभ नाकारला गेला, याची काही आकडेवारी आहे का, अशी विचारणा घटनापीठाने केली. त्यावर असा काही तपशील नसल्याचे सांगण्यात आले. या वेळी न्यायालयाने पांडे यांना अनेक प्रश्नही केले.

न्यायालयाचे प्रश्न..

आधारचे काम करणाऱ्या ४९ हजार केंद्रचालकांना तुम्ही काळ्या यादीत का टाकले, असे न्यायालयाने विचारले. त्यावर हे केंद्रचालक गैरप्रकार करीत होते, लोकांना वेळेत सेवा देत नव्हते आणि अनेकदा तर कार्ड देणे पूर्ण मोफत असतानाही पैसे घेत होते. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई केल्याचे पांडे म्हणाले. मात्र तुम्हीच निवडलेल्या आणि नेमलेल्या कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्याची वेळ का आली, असा सवालही न्यायालयाने केला. आधार कार्डावरील माहिती अद्ययावत करण्याचा ऑनलाइन पर्याय उपलब्ध असला तरी अनेक गरीब, निरक्षर आणि आदिवासींना ते कसे जमेल, असा सवालही घटनापीठाने उपस्थित केला आहे.