मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर पुढे काय, हा प्रश्न अरविंद केजरीवाल यांना ‘आप’चे नेते, कार्यकर्ते विचारत आहेत. पक्षबांधणीसाठी केजरीवाल यांनी राजीनामा दिला आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा उधळलेला वारू रोखण्यासाठी लोकसभेच्या ११८ जागी उमेदवार उभे करण्याच्या इराद्यात ‘आप’ नेते आहेत.
‘केजरीवाल यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढणार’
सत्तास्थापनेमुळे केजरीवाल दैनंदिन कामकाजात अडकून पडले होते. त्यांना इतर नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास फारसा वाव मिळत नव्हता. लोकसभा निवडणूक जवळ येत होती, तर प्रशासकीय वेळकाढूपणामुळे केजरीवाल फारसे प्रभावी निर्णय घेऊ शकले नाही. काँग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा काढण्याच्या मनस्थितीत नव्हता. अशावेळी कोणतेही कारण पुढे करून सत्तेतून पायउतार व्हायचे व लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करायचा, अशी रणनीती केजरीवाल यांनी आखली होती.
दिल्लीत राष्ट्रपतीराज
पहिला डाव बरोबर पडला असला तरी दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने केजरीवाल यांची कोंडी झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी आगामी काळात केजरीवाल संघटना बांधणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे ‘आप’च्या गोटातून सांगण्यात आले.
सरकारच्या राजीनाम्यानेदु:स्वप्न संपले -जेटली
केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी भ्रष्ट मंत्र्यांची यादी घोषित केली होती. तेव्हाच केजरीवाल राजीनामा देणार असल्याची कुजबुज सुरू झाली होती. भ्रष्ट मंत्र्यांविरोधात प्रचार केल्यास त्याचा लाभ ‘आप’ला मिळू शकतो. शिवाय लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी ‘आप’चे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, असा ‘आप’चा अहवाल आहे. परंतु प्रचारासाठी अरविंद केजरीवाल मैदानात उतरणार असतील तरच लोकसभा निवडणुकीत पक्षाला लाभ मिळेल, असा  पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांचा कयास आहे. लोकसभा निवडणुकीसोबत दिल्ली विधानसभेची निवडणूक घेतल्यास केजरीवाल यांची कोंडी होईल. लगेचच निवडणूक झाल्यास पुन्हा केजरीवाल सत्तेत येतील व  भाजप व काँग्रेस या दोन्ही प्रस्थापित पक्षांना अपशकुन होईल. निवडणूक आयोगाने मात्र कोणत्याही क्षणी निवडणुकीस तयार असल्याचे संकेत दिले आहेत. आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून, लोकसभा निवडणुकीसोबतच दिल्ली विधानसभेची निवडणूक घेण्याचा सरकारचा मानस आहे.
केजरीवाल यांच्यामुळे दिल्लीत अस्थिरता निर्माण झाली. ‘आप’ सरकारचे ४८ दिवस प्रशासनातील सर्वाधिक वाईट दिवस होते.
डॉ. हर्षवर्धन, भाजप नेते.
केजरीवाल घटनाविरोधी वागल्यानेच आम्ही विरोधात मतदान केले होते. राजीनामा देऊन त्यांनी जनमताचा अनादर केला आहे.
अरविंदर सिंह लवली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष.