दिल्लीत आम आदमी पक्षाचे(आप) मंत्री जितेंद्रसिंग तोमर यांना खोट्या पदवी प्रकरणावरून अटक करण्यात आली. मग, महाराष्ट्रात भाजपचे मंत्री बबनराव लोणीकर निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात खोटी शैक्षणिक माहिती पुरविल्याचा आरोप असतानाही मोकाट का? असा सवाल उपस्थित करीत ‘आप’ने लोणीकर यांच्या अटकेची मागणी केली आहे.
ज्यापद्धतीने आमच्या मंत्र्यावर (जितेंद्रसिंग तोमर) कारवाई करण्यात आली. त्याच पद्धतीने राज्य सरकारने लोणीकर यांच्यावर कारवाई करून दाखवावी, असे जाहीर आव्हान आपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिती शर्मा मेनन यांनी भाजप सरकारला दिले आहे.
बबनराव लोणीकर यांना अटक करून त्यांनी कुठे आणि कोणत्या विद्यालयातून पदवी ग्रहण केली याची चौकशी करणार का? असे मेनन म्हणाल्या. लोणीकर यांच्या खोटी पदवीचा प्रकार उघडकीस आल्याचे प्रकरण हे मोदी सरकारच्या दुटप्पीपणाचा सबळ पुरावा असल्याचेही त्या पुढे म्हणाल्या. मेनन यांच्यासोबत आपचे नेते रवि श्रीवास्तव यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. जितेंद्रसिंग तोमर यांचे प्रकरण न्यायालयात असतानाही त्यांना अटक केली जाते मग भाजपच्या बबनराव लोणीकर यांना मात्र वेगळी वागणूक का दिली जाते? असे श्रीवास्तव म्हणाले.
मराठवाडय़ातील परतूरचे भाजपचे आमदार असलेल्या बबनराव लोणीकर यांनी २००४, २००९ आणि २०१४ या तीन निवडणुकांच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये वेगवेगळी माहिती दिली आहे. २००४ आणि २००९ च्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए प्रथम वर्ष अशी शैक्षणिक माहिती सादर केली होती. पण २०१४ च्या निवडणुकीत शिक्षण इयत्ता पाचवी अशी माहिती दिल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.