आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. भाजप सांप्रदायिकतेचे राजकारण करत पाकिस्तानचे हित साधत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘आप’च्या पाचव्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी देशभरातून कार्यकर्ते आले होते. देश नाजूक स्थितीतून जात आहे. दुसरीकडे हिंदू-मुसलमान यांना आपांपसात लढवून देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदू-मुसलमानांच्या नावावर भारताची फाळणी करण्याचे पाकिस्तानचे पूर्वीपासूनचे स्वप्न आहे, असे म्हणत जे लोक देशातील हिंदू-मुसलमानांमध्ये फूट पाडत आहेत, ते पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे ‘एजंट’ आहेत. ते राष्ट्रभक्तीचा वेश परिधान केलेले देशद्रोही आहेत. देश तोडण्याचे जे काम आयएसआयला ७० वर्षांत करता आले नाही ते काम भाजपने तीन वर्षांत केले, असा टोलाही लगावला.

भ्रष्ट्राचाराच्या मुद्यावरूनही केजरीवाल यांनी भाजपवर टीका केली. काँग्रेसप्रमाणेच भाजप सरकारनेही तीन वर्षांत घोटाळ्यांची मालिकाच केल्याच आरोप केला. गुजरात विधानसभा निवडणुकीचा हवाला देत त्यांनी भाजपला मुळापासून उखडून टाकण्याची वेळ आली असल्याचे सांगत भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, भाजपवर टीका करतानाच त्यांनी आपमध्ये सध्या सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदांवरही भाष्य केले. ते म्हणाले, जेव्हा पक्ष आणि देश हितांमध्ये विरोधाभास निर्माण होतो. तेव्हा पक्ष हितापेक्षा देश हितासाठी काम केले पाहिजे.