दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील ‘आप’ शासनाने जनतेच्या सोयीसाठी उचललेल्या विविध पावलांची ‘छाप’ आता देशभर उमटू लागली आह़े. दिल्लीच्या धर्तीवर मध्य प्रदेशातील भाजप शासनानेही लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आणि लालफितीत अडकलेल्या कामांच्या तक्रारीसाठी ‘हेल्पलाइन’ क्रमांक सुरू केला आह़े.
शासकीय कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास किंवा एखादे शासकीस काम रखडले असल्यास आता मध्य प्रदेशातील जनतेला ९००९१३३३२२ या क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे, अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली़  मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या सूचनेनुसार ही हेल्पलाइन सुरू करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितल़े
भाजप सत्तेत आल्यास देशभर ‘हेल्पलाइन’ – वरुण गांधी
येत्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आल्यास नवीन शासन देशभर एक ‘हेल्पलाइन’ सुरू करेल़  या हेल्पलाइनवर कोणताही सर्वसामान्य नागरिक संपर्क करून भ्रष्ट अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करू शकेल, असे आश्वासन भाजपचे महासचिव वरुण गांधी यांनी शनिवारी येथे दिल़े ‘संपुआ’च्या कार्यकाळात पोलीस ठाणी आणि इतर शासकीय कार्यालये भ्रष्टाचाराची केंद्रे झाली आहेत़  मात्र आम्ही सत्तेत आल्यास हेल्पलाइनचा पर्याय जनतेला उपलब्ध करून देऊ, असे गांधी यांनी पश्चिम बंगालमधील एका जाहीर सभेत सांगितल़े  दिल्लीतील केजरीवाल शासनाने सुरू केलेल्या हेल्पलाइनवर दीड दिवसात २३ हजार ५०० दूरध्वनी आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी गांधी यांनी ही घोषणा केली आह़े