लोकसभा निवडणुकीच्या चौध्या टप्प्याचे मतदान दि. १३ रोजी पूर्ण झाले. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यानंतर निवडणूक प्रचारातील मुद्दे आणि विषय बदलत गेले. आरक्षण, राम मंदिर, कलम ३७०, संविधान बदलाची चर्चा अशा काही मुद्द्यावर जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत आणखी एक विधान केले आहे. ज्यामुळे या विषयाला पुन्हा तोंड फुटले आहे. “निमंत्रण मिळूनही आण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला नाईलाजाने उपस्थित राहू शकलो नाही. कारण मी दलित आहे”, असे विधान खरगे यांनी केले आहे.
झारखंडमधील नेतरहाट मतदारसंघात निवडणुकीच्या जाहीर सभेला संबोधित करत असताना हे विधान केले. खरगे म्हणाले की, मी दलित आहे. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर मला अपमानित व्हावे लागू नये, यासाठी मी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिलो नाह. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी आहेत. त्यांना नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उदघाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला निमंत्रित का केले नाही? माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दलित आहेत, त्यांनाही दोन्ही समारंभाला निमंत्रित का केले गेले नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
मला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले होते. पण माझ्या जाण्यानंतर तिथे शुध्दीकरण तर केले जाणार नाही ना? तसेच मला राम मंदिराच्या मूर्तीजवळ जाऊ दिले जाईल की नाही? अशी भीती माझ्या मनात होती, त्यामुळेच मी उपस्थित राहिलो नाही, असा दावा खरगे यांनी केला.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, तुम्ही (मोदी) दलित आणि आदिवासी व्यक्तीला राष्ट्रपती केल्याचे सांगता. पण त्यांना तुम्ही प्राणप्रतिष्ठा सोहळयासाठी बोलवत नाहीत. कारण त्यांच्या येण्याने अपवित्र व्हाल, असे तुम्हाला वाटते. त्यामुळेच मोदी यांचा पराभव करण्यासाठी जात आणि समाजाच्या मानसिकतेतून बाहेर येऊन मतदान करा, असे आवाहन खरगे यांनी केले.
पंतप्रधान मोदींच्या राज्यात हुकूमशाहीचा उदय झाला असून संविधान, लोकशाही कशी धोक्यात आली आहे, आचाही दाखला खरगे यांनी दिला. झारखंडचे आदिवासी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना चुकीच्या खटल्यात अडकवून तुरुंगात टाकले गेले आहे. ते भाजपाचा पराभव करतील, अशी त्यांना भीती होती. त्यामुळे आदिवासी विरोधी भाजपाला धडा शिकविण्यासाठी मतदारांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहनही खरगे यांनी केले.