प्रस्थापित भाजपला विधानसभा निवडणुकीत चारी मुंडय़ा चीत करणाऱ्या आम आदमी पक्षाने मंत्रिमंडळ निवडताना सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. येत्या १४ फेब्रुवारीला होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात अरविंद केजरीवाल यांच्यासह पहिल्यांदाच निवडून आलेले चार आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. मागील सरकारमधील सर्व मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाच्या विस्तारासाठी अरविंद केजरीवाल यांनी वेळ देता यावा म्हणून मनीष सिसोदिया यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या प्रस्तावावर आपच्या संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
मागील सरकारमध्ये मंत्री असलेल्या राखी बिडलान, सोमनाथ भारती, गिरीश सोनी व सौरभ भारद्वाज यांना यंदा संधी दिली जाणार नाही. त्यांच्याऐवजी जितेंद्र तोमर, कपिल मिश्रा, संदीप कुमार व आसीम अहमद खान यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. प्राथमिक माहितीनुसार केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश नसेल. आसीम अहमद खान यांना अल्पसंख्याक असल्याने प्राधान्य दिले जाणार आहे. सिसोदिया यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सत्येंद्र जैन यांनाही डच्चू देण्यात येणार आहे. यापूर्वी आपच्या सरकारमध्ये जैन यांच्याकडे आरोग्य खाते होते. सिसोदिया यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवून पक्षात तेच दुसऱ्या क्रमांकाचे नेते असल्याचा संदेश स्वपक्षीय आमदार व सामान्य कार्यकर्त्यांना देण्याची रणनीती आपने आखली आहे. रामनिवास गोयल यांना विधानसभेचे सभापतीपद देण्यात येणार असल्याचा दावा पक्षसूत्रांनी केला.     

अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांची भेट घेत त्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहता येणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याची माहिती आप नेते मनीष सिसोदिया यांनी दिली.