दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्याच पक्षाचे म्हणजे आम आदमी पार्टीचे बंडखोर आमदार कपिल मिश्रा यांच्यातील वाद सातत्याने माध्यमांध्ये गाजू लागल्यानंतर ‘आप’ ने त्यांना अपात्र घोषित केले होते. दिल्ली विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी कपिल मिश्रा यांना अपात्र घोषित केले होते. आम आदमी पार्टीचे आमदार सौरभ भारद्वाज यांच्या तक्रारीनंतर कपिल मिश्रावर ही कारवाई करण्यात आली होती. या घडामोडींनतर ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. अखेरीस राजकीय वर्तुळातील ही चर्चा खरी ठरली आहे. कपिल मिश्रा हे उद्या (शनिवार) ११ वाजता भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांनी स्वतः या वृत्तास दुजोरा दिला आहे.

मागील काही दिवसांपासून कपिल मिश्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या कामाची सातत्याने प्रशंसा करत असल्याने ते भाजपाच्या वाटेवर आहेत, याचा सर्वांनाच अंदाच आला होता. एवढेच नाहीतर त्यांनी अशातच एक ट्विटद्वारे हे देखील म्हटले होते की, ते पंतप्रधान मोदींसाठी शंभर वेळा खुर्ची सोडू शकतात.

या अगोदर कपिल यांनी केजरीवाल यांच्यावर टीक करताना म्हटले होते की, काहीजण म्हणत आहेत की पुलवामा हल्ल्यातील आरोपी आदिल अहमद डार पोलिसांच्या मारहाणीनंतर दहशतवादी बनला, जर एक झापड तुम्हाला दहशतवादी बनवत असेल तर मग केजरीवाल तर ओसामा लादेन झाले असते.