सरकारी कार्यक्रमांच्या प्रसिद्धीसाठी ५२६ कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल आम आदमी पार्टीचे (आप) आमदार पंकज पुष्कर यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढविला आहे. हा स्वयंप्रचार करण्याचा खटाटोप असल्याचे पुष्कर यांनी म्हटले आहे.
गलेलठ्ठ पगार देऊन दिल्लीतील आपच्या कार्यकर्त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रकार म्हणजे जनतेच्या पैशांची उधळपट्टी असल्याची टीका पुष्कर यांनी केली.
त्याचप्रमाणे पक्षाच्या २१ आमदारांची संसदीय सचिव म्हणून नियुक्ती करण्याबाबत त्यांनी सवालही उपस्थित केला.
दिल्ली सरकारने अलीकडेच केलेल्या जाहिरातीबाबत पुष्कर म्हणाले की, यामुळे दिल्ली सरकारने केवळ सर्वोच्च न्यायालयाचा आदेशच झुगारला नाही तर महिलांचे प्रतिगामी चित्र रंगविले आहे. या बाबींकडे आपण केजरीवाल यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे, तरीही त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असेही पुष्कर म्हणाले.
जाहिरातीमध्ये केजरीवाल यांच्या छायाचित्राचा वापर करण्यात आलेला नाही असा तांत्रिक बचाव केला जात आहे, मात्र जाहिरातीत दोन मिनिटांत केजरीवाल यांचे नाव ११ वेळा घेण्यात आले आहे, असे पुष्कर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.