आम आदमी पक्षाच्या धोरणांवर टीका करणे कुमार विश्वास यांना चांगलेच महागात पडत असल्याचे दिसते. आपने त्यांना राजस्थानच्या प्रभारी पदावरून हटवले आहे. आता पक्षात ते फक्त संस्थापक सदस्य म्हणूनच राहतील. त्यांच्या जागी दीपक वाजपेयी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर सुरू असलेल्या मतभेदांमुळे त्यांना राज्यसभेची उमेदवारीही देण्यात आली नव्हती. इतके नव्हे तर अनेक महत्वाच्या क्षणी त्यांना बोलण्याची संधीही देण्यात आली नव्हती.

पक्षाचे नेते आशुतोष यांनी पत्रकार परिषदेत कुमार विश्वास यांना पदावरून हटवण्यात आल्याची घोषणा केली. कुमार विश्वास यांच्याकडे वेळेची कमतरता असते. त्यामुळे त्यांची जबाबदारी काढून घेण्यात आल्याचे आशुतोष यांनी सांगितले. पक्षाच्या या निर्णयावर कुमार विश्वास यांची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. राजस्थानमध्ये यावर्षाअखेर विधानसभा निवडणुका होणार आहेत. दीपक वाजपेयी अनेक वर्षांपासून राजस्थानमध्ये सक्रीय असल्यामुळे त्यांनाही संधी देण्यात आल्याचे सांगण्यात येते.