विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने(भाजप) दिल्लीतील प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर दिलेल्या जाहिरातींवर आम आदमी पक्षाने आक्षेप घेतला आहे.
दिल्लीतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने केंद्रात सत्तेत आल्यानंतर केलेल्या कामांचा आधार घेऊन दिलेली जाहिरात म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे ‘आप’चे नेते आशुतोष यांचे म्हणणे आहे. तसेच “प्रचाराची मुदत संपल्यानंतरही अशा प्रकारच्या जाहिरातींसाठी परवानगी कशी मिळते. भाजपकडे अशा जाहिरातींसाठी निधी कोठून मिळतो? जर अशा प्रकारच्या जाहिरातींना दूरचित्रवाहिनीवर परवानगी नसेल तर वृत्तपत्रांत जाहिराती देण्यासाठी कशी काय परवनागी मिळते?‘ असे सवाल देखील आशुतोष यांनी उपस्थित केले आहेत. यास प्रत्युत्तरात भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा म्हणाले की, ” आम आदमी पक्षाने आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप आमच्यावर केलेला आहे. मला वाटते त्यांना आचारसंहितेचे नियम माहित नाहीत. केवळ अशा प्रकारची विधाने करून त्यांना बातम्यांमध्ये रहायचे आहे. जाहिरातींमध्ये लोकांच्या माहितीसाठी भारतीय जनता पक्षाचा केवळ अजेंडा दाखविण्यात आला आहे. हा कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग नाही.”