आम आदमी पक्षाचे नाराज आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी आज (गुरूवार) दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्याच पक्षाच्या कार्यपध्दतीचे वाभाडे काढत केजरीवाल आणि टीमला घरचाच आहेर दिला.
‘आम आदमी’ आणि माझ्यात मतभेद नाहीत; बिन्नी यांचे स्पष्टीकरण
पक्षाची कार्यशैली बदलली असल्याचा आरोप बिन्नी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.
“आम आदमी पक्ष कुणाला मंत्री बनवण्यासाठी निर्माण झाला नाही. अण्णा हजारेंच्या आंदोलनातून पक्ष निर्णाण झाला. मोफत पाणी देण्याच्या निर्णयावर पक्षाने भूमिका बदलली. दिल्लीच्या जनतेला ७०० लिटर पाणी मोफत देण्याचा उल्लेख निवडणूक घोषणापत्रामध्ये  करण्यात आला होता. मात्र, मोठ्या चलाखीने त्यात बदल करण्यात आला. सरकार बनवल्यावर मोठ्या कार्यालयांमध्ये मंत्री बसले व दिल्लीच्या जनतेला विसरले. वीज दर ५० टक्के कमी करण्याचा उल्लेख देखील घोषणापत्रामध्ये होता. त्यामध्ये देखील बदल करण्यात आला. ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे.” असे बिन्नी पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.
दिल्लीत ‘आप’ च्या आमदाराचे बंड?
“खोटे बोलून सरकार  टीकणार नाही. खोटे बोलणाऱ्यांनी त्वरीत राजीनामे द्यायला हवेत. मी स्वार्थासाठी पक्षामध्ये आलो नाही. दिल्लीमधील महिलांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा दल स्थापण्याचे आश्वसन देखील केजरीवाल यांनी पूर्ण केले नाही. कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन देणार नाही व कुणाचे समर्थन घेणार नाही अशी पक्षाची भूमिका असताना सत्तेसाठी अचानक घुमजाव करण्यात आले. केजरीवाल यांची पक्षामध्ये हुकूमशाही सुरू आहे,” असा आरोप बिन्नी यांनी केला. एवढे आरोप केल्यानंतर देखील ते पक्ष सोडणार नसल्याचे बिन्नी यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी सांगितले.
दरम्यान, बिन्नी यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे  ‘आप’चे नेते गोपाल राय यांनी सांगितले आहे.