दिल्लीतील गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सरकार स्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. दिल्लीतील जनतेने सरकार स्थापनेबाबत कौल दिला असून आम्ही सक्षमपणे सरकार चालवू शकतो़  त्यामुळे आपण सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे ‘आप’चे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांनी रविवारी प्रथमच स्पष्ट केले.
काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे मत जाणून घेऊनच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार सोमवारी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांना भेटून पक्षांच्या निर्णयाची माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितल़े  मात्र तत्पूर्वी जागोजागी सभा घेऊन पुन्हा जनतेचे मत जाणून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितल़े  
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी २८ जागा आपने जिंकल्या आहेत, तर भाजप ३१ आणि काँग्रेसला आठ जागांवर समाधान मानावे लागले होते. भाजपने सरकार स्थापनेस नकार दिल्यामुळे नायब राज्यपालांनी ‘आप’ला सत्ता स्थापनेसाठी पाचारण केले होते. काँग्रेसनेही ‘आप’ला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. मात्र तरीही ‘आप’ने सरकार स्थापण्याबाबत लगेच निर्णय न घेतल्याने दिल्लीत सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला होता़
सरकार स्थापनेसाठी काँग्रेसची मदत घेणार याबाबत केजरीवाल यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. आम्ही सोमवारी ठिकठिकाणी लोकांच्या सभा घेणार आहोत.  या सभांमधून जो निर्णय पुढे येईल, त्यानुसार आम्ही विचार करणार आहोत. आतापर्यंत सामान्य जनता केवळ मतदान करीत होती, मात्र मतदानानंतरही नागरिकांनी सरकार स्थापनेबाबत निर्णय घेण्याची ही घटना भारतात प्रथमच घडत आहे. ही खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धती असल्याचे केजरीवाल यांनी म्हटल़े