मेदन शहरातील कारागृहास आग लावून क्षमतेपेक्षा अधिक कैदी असलेल्या कारागृहातून पलायन केलेल्या १०० कैद्यांचा इंडोनेशियाचे पोलीस सोध घेत आहेत. कारागृहात उसळलेल्या दंगलीनंतर तेथे आग लावण्यात आली त्यामध्ये पाच जण ठार झाले असून आता त्या कारागृहावर सुरक्षा रक्षकांनी नियंत्रण मिळविले आहे.
सुमात्रा बेटावरील मेदान कारागृहात कैद्यांमध्ये दंगल उसळली त्यानंतर कारागृहाला आग लावण्यात आली आणि कैद्यांनी रक्षकांवर बाटल्या फेकल्या. सातत्याने खंडित होणारा विजेचा पुरवठा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई याच्या निषेधार्थ कैद्यांनी रक्षकांवर हल्ला चढविला.
कैद्यांनी लावलेल्या आगीमुळे तांजुंग कारागृहाला ज्वाळांनी वेढले. अग्निशामक यंत्रणा रात्रभर आग आटोक्यात आणण्याच्या कामात व्यस्त होती.
कारागृहातील या गदारोळाचा फायदा उठवून जवळपास १५० कैद्यांनी पलायन केले. त्यामध्ये काही दहशतवाद्यांचाही समावेश आहे. पोलीस आणि सैनिकांनी या फरारी कैद्यांचा शोध सुरू केला आहे. या कारागृहावर नियंत्रण मिळविले असून सैनिकांनी तेथे प्रवेश केला आहे. सदर कारागृहाची १०५४ कैद्यांची क्षमता असताना तेथे दुप्पट कैद्यांना ठेवण्यात आले आहे.
कारागृहात उसळलेल्या दंगलीत तीन कैदी आणि कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांसह पाच जण ठार झाले. फरारी कैद्यांचा शोध घेण्यासाठी एक हजार पोलीस आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. फरारी कैद्यांमध्ये दहशतवादी कारवायांसाठी अटक करण्यात आलेल्या सहा जणांचा समावेश आहे.