‘कट्टरतावादी राष्ट्र’ अशी भारताची प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवाद आणि ‘भारतमाता की जय’ या घोषणेचा गैरवापर करण्यात येत आहे, अशा शब्दांत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शनिवारी भाजपवर हल्ला चढवला.

राष्ट्रवाद आणि ‘भारतमाता की जय’ या घोषणेचा गैरवापर करताना ‘जहाल आणि भावनिक राष्ट्र’ या संकल्पनेतून लाखो भारतीयांना वगळण्यात येत आहे, असा आरोपही डॉ. सिंग यांनी केला. ‘हू इज भारतमाता’ या पुरुषोत्तम अग्रवाल आणि राधा कृष्णालिखित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात डॉ. सिंग बोलत होते. या पुस्तकात पं. जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यावरील लेख, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची त्यांची पत्रे, त्यांच्या मुलाखती आणि भाषणांचा समावेश आहे.  भारताचा महत्त्वाची जागतिक शक्ती असा विचार केल्यास त्याचे शिल्पकार देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू ठरतात, असे डॉ. सिंग म्हणाले.

त्यावेळच्या अस्थिर आणि देशाच्या जडणघडणीच्या काळात पं. नेहरू यांनी देशाचे नेतृत्व केले. अनेक भाषा येत असलेल्या नेहरूंनी आधुनिक भारतात अनेक विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्था आणि सांस्कृतिक संस्थांची पायाभरणी केली, असेही डॉ. सिंग म्हणाले.

दुर्दैवाने देशातील ज्या एका गटाला इतिहास वाचायचा नाही किंवा जे हेतुत: आपल्या पूर्वग्रहांनुसार विचार करतात ते पं. नेहरू यांची चुकीची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु खोटेपणा नाकारण्याची क्षमता इतिहासामध्ये आहे.

– डॉ. मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान