कर्नाटकातील ज्येष्ठ महिला पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याकांडप्रकरणी नवी माहिती आता समोर आली आहे. लंकेश यांची हत्या करणारा मुख्य आरोपी परशुराम वाघमारे याला हत्येचे प्रशिक्षण देण्यात आले होते. एम. एम. कलबुर्गी यांची ज्या पद्धतीने डोक्यात गोळी झालून हत्या करण्यात आली होती. त्याप्रकारे लंकेश यांच्याही डोक्यात गोळी झाडण्याबाबत त्याला कट्टर हिंदुत्ववादी गटाकडून सांगण्यात आले होते.

मारेकरी परशुराम वाघमारे (वय २६) याने स्वतः आपल्याला प्रशिक्षण दिल्याची कबुली दिली आहे. त्याने विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) सांगितले की, कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमाभागीतील बेळगाव येथील जंगलात एका कट्टर हिंदुत्ववादी गटाकडून हे प्रशिक्षण देण्यात आले होते. दरम्यान, किमान एकतरी गोळी लंकेश यांच्या डोक्यात झाडायची असे आपल्याला सांगण्यात आले होते. या प्रशिक्षणावेळी कलबुर्गींच्या हत्येत सहभाग असलेला एक आरोपीही सहभागी होता. यावरुन परशुरामला ट्रेनिंग देणारेच थेट कलबुर्गींच्या हत्याप्रकरणात सहभागी होते असे एसआयटीने म्हटले आहे. ३० ऑगस्ट २०१५ रोजी झालेल्या कलबुर्गींच्या हत्येचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही.

कर्नाटक राज्य न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, गौरी लंकेश आणि एम. एम. कलबुर्गी यांची हत्या ७.६५ एमएम देशी कट्ट्याने गोळ्या झाडून करण्यात आली होती. ३० मे रोजी एसआयटीने दाखल केलेल्या आरोपपत्रात देखील याचा उल्लेख करण्यात आला आहे. कलबुर्गींना धारवाड येथील त्यांच्या घराच्या दरवाजातच अज्ञात हल्लेखोरांनी गोळी मारुन हत्या केली होती. त्यांच्या थेट डोक्यातच गोळी मारण्यात आली होती. तर गौरी लंकेश संध्याकाळी आपल्या घरी परतल्या तेव्हा एका हेल्मेट घातलेल्या बंदुकधारी तरुणाने त्यांच्यावर चार गोळ्या झाडून हत्या केली होती.

एसआयटीने तपासादरम्यान हा हेल्मेट घातलेला परशुराम वाघमारे असल्याचे उघड केले आहे. यावेळी त्याचा साथीदार गणेश मिस्किन (वय २७) काही अंतरावर त्याची वाट पाहत उभा होता. एसआयटीच्या तपासात हे देखील उघड झाले आहे की, गणेशसोबत त्याने बंदुक चालवायचे प्रशिक्षण घेतले होते. याच प्रशिक्षणात राजेश बांगरा याचा देखील समावेश होता. बांगरा हा सरकारी कर्मचारी असून त्याच्याकडे परवाना असलेली दोन पिस्तुले आहेत. हिंदुत्ववाद्यांच्या गटामध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना तो प्रशिक्षण देण्याचे काम करतो.