सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीन वादावरील निकालात राम मंदिर उभारणीचा मार्ग खुला केल्याने आता अयोध्येचा संपूर्ण कायापालट करण्याचे तेथील प्रशासनाकडून ठरवण्यात आले आहे. त्यासाठी अयोध्येचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे.  या आराखडय़ानुसार अयोध्येत पंचतारांकित हॉटेल, रिसॉर्ट, आंतरराष्ट्रीय बस टर्मिनल व विमानतळ या सुविधा करण्यात येणार आहेत.  उत्तर प्रदेश सरकार शरयू नदीतून चालणारे क्रूझ (जहाज सेवा) सुरू करणार आहे.

विकास आराखडय़ाबाबत अयोध्येचे उप माहिती संचालक मुरलीधर सिंग यांनी सांगितले,की अयोध्या तीर्थ विकास परिषदेची स्थापना करण्यात येणार असून अयोध्येचे रूपांतर तिरूपतीसारख्या शहरात करण्यासाठी साधारण चार वर्षे लागणार आहेत. याबाबतचे काम त्वरेने सुरू करण्यात येत असून अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात येणार आहे. एप्रिल २०२० च्या रामनवमीला पहिले विमान उड्डाण येथून होईल अशी अपेक्षा आहे.  अयोध्या रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्यात येणार असून बस टर्मिनलही सुरू करण्यात येणार आहे. फैजाबाद ते अयोध्या दरम्यान पाच किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्याची योजना आहे. डिसेंबरमध्ये अयोध्येत पंचतारांकित  हॉटेल्स व रिसॉर्ट बांधण्याचे काम सुरू होईल.

अयोध्येतील राम मंदिर भव्य म्हणजे बहुदा देशातील सर्वात मोठे धार्मिक ठिकाण राहील. जर २००० कारागिरांनी रोज आठ तास काम केले तर अडीच वर्षांत मंदिराची निर्मिती होऊ शकेल. दगड तासण्याचे काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. मंदिराच्या आजूबाजूच्या पाच कि.मी. परिसराच्या देखरेखेची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची संमती असलेल्या ट्रस्टकडे असणार आहे. मंदिराच्या ७७ एकर परिसरात अनेक धार्मिक संस्था उभारण्यात येणार आहेत. गोशाळा, धर्मशाळा, वैदिक संस्था यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. अयोध्येचा विकास ‘अध्यात्मिक नगरी’ म्हणून केला जाणार आहे. १० श्रीरामद्वार बांधले जाणार आहेत. १० हजार सामुदायिक निवारे बांधले जाणार असून सरोवरांचे नूतनीकरण केले जाणार आहे.