अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराकमधील सैन्य कारवाईला योग्य ठरवलंय. इतकंच नव्हे तर हल्ल्यामध्ये खात्मा झालेला ईराणचा शक्तिशाली कमांडर जनरल कासीम सुलेमानी याचा नवी दिल्लीपासून ते लंडनपर्यंत दहशतवादी हल्ल्याचे कट रचण्यात सहभाग होता असाही आरोप ट्रम्प यांनी केलाय. याद्वारे ट्रम्प यांनी अमेरिका आणि ईराणच्या भौगोलिक व राजकीय भांडणात भारतालाही ओढण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

‘नवी दिल्लीतील दहशतवादी हल्ल्याची योजना आखण्यात सुलेमानी सहभागी होता. मध्यपूर्व भागाला अस्थिर करण्यासाठी दहशतवादी कृत्ये करण्याचे काम सुलेमानी करत होता’, असे त्याला ठार केल्यानंतर दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत ट्रम्प म्हणाले.

कोणत्या हल्ल्याबाबत बोलत आहेत ट्रम्प?
नवी दिल्लीतील एका इस्रायली राजनैतिक अधिकाऱ्याची पत्नी तिच्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी जात असताना, तिच्या मोटारीवर १३ फेब्रुवारी २०१३रोजी बॉम्बहल्ला करण्यात आला होता. या घटनेत कुणीही ठार झाले नव्हते. इस्रायलने इराणी शास्त्रज्ञांवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी थायलंड व जॉर्जियातील इस्रालयींवर जे साखळी बॉम्बहल्ले करण्यात आले, त्याचाच हा एक भाग असल्याचे नंतर मानले गेले. हा हल्ला करणाऱ्यांचा सुलेमानीच्या नेतृत्वाखालील इराणी रिव्हॉल्युशनरी गार्ड्सशी संबंध असल्याचा निष्कर्ष दिल्ली पोलिसांनीही तपासाअंती काढला होता. भारतानेही इराणला अशा घटनांबाबत इशारा दिला होता.

युद्धाचे ढग?
इराणकडून झालेल्या रॉकेट हल्ल्यानंतर युद्धाचे ढग दाटू लागले असून इराणमधील महत्त्वाची ५२ठिकाणे निशाण्यावर असल्याचा थेट धमकीवजा इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेने इराकची राजधानी बगदादमध्ये ड्रोनद्वारे क्षेपणास्त्र हल्ला करुन इराणी लष्करातील परदेशात काम करणाऱ्या अल्-कुद्स दलाचा शक्तिशाली कमांडर जनरल कासीम सुलेमानी याचा खात्मा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी रात्री उशिरा इराणने प्रतिहल्ला केला. त्यांनी बगदादमधील अमेरिकी दुतावास व अमेरिकेच्या अन्य ठिकाणांवर क्षेपणास्त्र तसेच मोर्टार डागल्या. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया आली आहे. ”अमेरिकी नागरिक आणि अमेरिकेच्या स्थळांवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही. हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही. जर इराणने आमच्या ठिकाणांवर हल्ला केला तर इराणमधील ५२ ठिकाणे आमच्या निशाण्यावर असतील. इराणने पुन्हा हल्ला करु नये असा माझा त्यांना सल्ला असेल. पण त्यांनी पुन्हा हल्ला केल्यास त्यांच्यावर कधीही झाला नसेल इतका शक्तीशाली हल्ला केला जाईल, अमेरिकेला नुकसान पोहोचवल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल”. अशी थेट धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. “अमेरिकेच्या सैन्याने इराणमधील ५२ ठिकाणं लक्ष्य केली असून यातील बहुतांश ठिकाणे ही इराणसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत किंवा तेथील सांस्कृतिक ठेवा आहेत. त्यामुळे इराणने वेळीच शहाणे व्हावे, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असेही ट्रम्प यांनी बजावले. दुसरीकडे, शनिवारी सकाळी ईराणने जामकरन मशिदीवर लाल झेंडा फडकावून युद्धाचे संकेत दिल्याचं म्हटलं जात आहे. जामकरन मशिदीवरील धार्मिक झेंडा काढून लाल झेंडा फडकवण्याचा अर्थ युद्धाच्या घोषणेच्या रूपात घेतला जात आहे. कारण, इराणमधील कुठल्याही मशिदीवर लाल झेंडा फडकवण्यात आल्याची घटना पहिल्यांदाच घडल्याचं सांगितलं जात आहे.