गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील सात वर्षे वयाच्या प्रद्युम्न या विद्यार्थ्यांची हत्या केल्याच्या आरोपाखाली सीबीआयने अटक केलेल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांने त्याच्या गुन्ह्य़ाची वडिलांसमोर तसेच एका स्वतंत्र साक्षीदारासमोर कबुली दिली असल्याचे या यंत्रणेने गुरुवारी एका बालगुन्हेगार न्यायालयाला सांगितले. या गुन्ह्य़ात इतर कुणी गुंतलेले आहे काय हे निश्चित करण्यासाठी या विद्यार्थ्यांची कोठडीत चौकशी होणे आवश्यक आहे, असे त्याच्या कोठडीची मागणी करण्यासाठी सीबीआयने गुरुग्रामच्या बाल गुन्हेगार न्यायालयासमोर केलेल्या अर्जात म्हटले आहे. प्रद्युम्नचा गळा चिरण्यासाठी वापरलेला चाकू या मुलाने कोणत्या दुकानातून खरेदी केला, तेही या अल्पवयीन मुलाकडून जाणून घ्यायचे असल्याचे सीबीआयने न्यायालयाला सांगितले. याशिवाय या गुन्ह्य़ामागे काही कट असल्यास त्याचा छडा लावण्यासाठी गुन्ह्य़ाचा प्रसंग त्याने खूनाची  कबुली दिली त्यावेळी  त्याचे वडील, स्वतंत्र साक्षीदार, सीबीआयचे अधिकारी हजर होते, असेही सीबीआयने अर्जात नमूद केले.