ब्रिटिश  खासदार डेबी अब्राहम यांचा ई-व्यवसाय  व्हिसा त्या भारतविरोधी कारवायात सामील असल्याने रद्द करण्यात आला आहे. १४ फेब्रुवारी रोजीच त्यांना ही माहिती कळवण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी मंगळवारी सांगितले.

व्हिसा व ई व्हिसा देणे, नाकारणे किंवा रद्द करणे हा कुठल्याही देशाचा सार्वभौम अधिकार आहे, असे सांगून सूत्रांनी म्हटले आहे, की अब्राहम यांना गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला ई व्हिसा देण्यात आला होता. त्याची मुदत ५ ऑक्टोबर २०२० पर्यंत होती. तो व्हिसा त्यांना व्यापार-व्यावसायिक बैठकांना उपस्थित राहण्यासाठी देण्यात आला होता. पण १४ फेब्रुवारी रोजी त्यांचा ई- व्यवसाय व्हिसा रद्द करण्यात आला आहे. कारण त्यांनी भारतविरोधी कारवाया केल्या आहेत. त्यांना याची माहिती १४ फे ब्रुवारी रोजी कळवण्यात आली होती.

अब्राहम यांच्याकडे त्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्या त्या वेळी वैध व्हिसा नव्हता. त्यामुळे सोमवारी त्यांना परत माघारी जाण्यास सांगण्यात आले.

नियमाप्रमाणे आधी दिलेला ई व्यवसाय व्हिसा व्यापार- व्यवसाय बैठकांसाठी होता, तो ब्रिटीश खासदार असलेल्या अब्राहम यांना कुटुंबीय व मित्रांना भेटण्यासाठी वापरता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  अब्राहम या काश्मीरविषयक ब्रिटिश संसदीय गटाच्या प्रमुख आहेत.

ब्रिटिश नागरिकांसाठी आगमनावेळी व्हिसाची तरतूद नाही

ब्रिटिश नागरिकांसाठी आगमनावेळी  व्हिसाची तरतूद नाही, त्यामुळे आगमनावेळी व्हिसा द्यायला हवा होता हा अब्राहम यांचा युक्तिवाद गैरलागू ठरतो असेही सूत्रांनी सांगितले.