अभिनेत्यांनी राजकारणात जाऊन नेते होणे देशासाठी घातक आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी व्यक्त केले. आपल्याला राजकारणात जाण्यात रस नसल्याचेही त्यांनी म्हटले. ‘अभिनेत्यांनी राजकारणात प्रवेश करणे मला आवडत नाही. अभिनेत्यांचा स्वत:चा असा एक चाहतावर्ग असतो. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या जबाबदारीबद्दल कायम जागरुक असायला हवे,’ असेही प्रकाश राज म्हणाले.

रजनीकांत, कमल हसन हे दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते राजकारणात जाणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांनी अभिनेते आणि राजकारण याबद्दलची त्यांची मते, अभिनेत्यांनी नेते होण्याबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट केली. ‘मला राजकारणात जाण्यात कोणताही रस नाही. त्यामुळे मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही,’ असे प्रकाश राज यांनी म्हटले. ‘अभिनेत्यांनी राजकारणात जाणे मला आवडत नाही. अभिनेत्यांनी नेते होणे देशासाठी घातक आहे,’ असेही ते म्हणाले. मात्र यावेळी त्यांनी रजनीकांत आणि कमल हसन यांच्या नावांचा उल्लेख टाळला.

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येवरुन थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणाऱ्या प्रकाश राज यांनी चित्रपटगृहातील राष्ट्रगीताच्या सक्तीवरही भाष्य केले. ‘एखाद्याने चित्रपटगृहात उभे राहून त्याची देशभक्ती दाखवावी, असे मला वाटत नाही,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. काही दिवसांपूर्वीच प्रकाश राज यांनी नोटाबंदीवरुन मोदींवर निशाणा साधला होता. ‘नोटाबंदी ही सर्वात मोठी घोडचूक होती. या निर्णयामुळे कोट्यवधी जनतेला त्रास झाला,’ असे ट्विट त्यांनी केले होते. ‘नोटाबंदीच्या काळात श्रीमंतांनी त्यांचा काळा पैसा पांढरा केला. मात्र याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला. असंघटित क्षेत्रातील लोकांना नोटाबंदीने मोठा हादरा दिला,’ असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

प्रकाश राज यांनी ऑक्टोबर महिन्यात ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या खून प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींवर शरसंधान साधले होते. ‘गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागेल किंवा नाही, मात्र सोशल मीडियावर असेही काही लोक आहेत जे त्यांच्या हत्येचे समर्थन करत आहेत. हे लोक कोण आहेत आणि त्यांची विचारसरणी काय आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सोशल मीडियावर हत्येचे समर्थन करणाऱ्यांना पंतप्रधान मोदी फॉलो करतात. याचीच चिंता मला सतावत आहे,’ असे म्हणत ‘आपला देश नेमका कोणत्या दिशेने चालला आहे ?,’ असा प्रश्न प्रकाश राज यांनी उपस्थित केला होता.