कास्टिंग काऊच अर्थात सिनेमात काम मिळावे म्हणून अभिनेत्रीचे लैंगिक शोषण केले जाण्याचे प्रकार हिंदी सिनेसृष्टीत बऱ्याचदा ऐकायला मिळाले आहेत. मात्र दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही अशाच प्रकारचे आरोप होत आहेत. एवढेच नाही तर एका तेलुगू अभिनेत्रीने रस्त्यावर टॉपलेस होत ‘कास्टिंग काऊच’ मागणीचा कडाडून विरोध केला. हैदराबाद येथील तेलुगू फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या परिसरात तिने टॉपलेस होऊन कास्टिंग काऊचचा निषेध केला.

मला सिनेमात काम करण्यासाठी योग्य संधी दिली जात नाही. उलट शोषण केले जाते असा आरोप या अभिनेत्रीने केला. तसेच टॉपलेस होऊन तिने पुरुषी मानसिकतेचा निषेधही केला. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करणारे निर्माते, दिग्दर्शक माझेच नाही तर अनेक अभिनेत्रींचे लैंगिक शोषण करत आहेत. याबाबत फिल्म चेंबर्स चे सदस्य मूग गिळून गप्प बसले आहेत असाही आरोप या अभिनेत्रीने केला. तेलुगू सिनेसृष्टीत किमान ७५ टक्के तेलुगू अभिनेत्रींना आधी संधी दिली गेली पाहिजे अशी मागणी या अभिनेत्रीने केली. तसेच मला फिल्म चेंबरचे सदस्य करण्यात यावे अशीही मागणी या अभिनेत्रीने केली आहे.

कास्टिंग काऊचचा मुद्दा तेलुगू सिनेसृष्टीत पहिल्यांदा पुढे आलेला नाही. याआधी या अभिनेत्रीने हा मुद्दा पुढे आणत आपल्याला चेंबरचे सदस्य करावे अशी मागणी केली आहे. अनेक प्रतिथयश निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर या अभिनेत्रीने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. आता शनिवारी ही अभिनेत्री टॉपलेस झाल्याने या अभिनेत्रीचीच चर्चा सिनेसृष्टीत होत आहे.