देशभक्ती किंवा धर्म म्हणजे काय हे सांगणारे तुम्ही कोण, असा सवाल काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने भाजपाला केला आहे. युती सरकारनंतर देशात विकासापेक्षा हिंसक वातावरण वाढल्याची टीका उर्मिलाने केली आहे. बुधवारीच उर्मिलाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ असं म्हटलं जातं. मात्र हे प्रेम कुठे आहे? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढलं, एकमेकांविषयी द्वेष वाढला. विकासाचं चित्र कुठे आहे? विकासाची स्वप्न दाखवली गेली. विकासाच्या परीकथा सांगितल्या गेल्या. मात्र प्रत्यक्षात परीकथा नसून पिशाच्चकथा झाली आहे, अशी सडकून टीका उर्मिलाने केली. खरी देशभक्ती म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? हे सांगणारे तुम्ही कोण असा प्रश्न उपस्थित करत भाजपाने जनतेला केवळ आश्वासनं दिल्याचं उर्मिलाने म्हटलं. नोकऱ्या कुठे गेल्या, काळा पैसा कुठे गेला, असा प्रश्नही उर्मिलाने उपस्थित केला. त्याचप्रमाणे प्रत्येकाने हा प्रश्न सरकारला विचारावा, बाहेर येऊन बोलावं असंही आवाहन तिने केलंय.

महिलांचे प्रश्न, कर, बेरोजगारी, मराठी माणसांचा मुद्दा हे विषय महत्त्वाचे असून याकडे आतापर्यंत दुर्लक्ष केल्याचं उर्मिलाने सांगितलं. धर्म-जातीच्या आधारे विचारले जाणारे प्रश्न बिनबुडाचे आहेत, व्यक्ती कोण आहे, ती काय बोलते हे महत्त्वाचं असल्याचं उर्मिला म्हणाली.

उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उर्मिलाची भाजपा नेते गोपाळ शेट्टी यांच्याबरोबर लढत होण्याची शक्यता आहे. गोपाळ शेट्टी उत्तर मुंबईचे विद्यमान खासदार आहेत.