जगभर रोजगाराचे स्वरूप बदलत असून तरुण पिढीला त्या बदलांशी जुळवून घ्यावे लागेल. हे बदलते स्वरूप काय आहे हे ओळखून त्यानुसार शिक्षण आत्मसात करण्यातही लवचीकता दाखवावी लागेल. कडव्या स्पध्रेला सामोरे जावे लागेल, त्यासाठी बहुविध शिक्षणाची जोड द्यावी लागेल, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी म्हैसूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमात पंतप्रधानांनी दूरचित्रवाणी संवादाद्वारे नव्या शैक्षणिक धोरणातील बदलाचा हेतू स्पष्ट केला. सध्याचे युग कौशल्यावर आधारित असल्यामुळे नव्या पिढीला कौशल्ये मिळवावी लागतील. काहींना नव्याने कौशल्ये शिकावी लागतील. वेळप्रसंगी स्वत:कडे असलेल्या कौशल्यांचा विस्तार करावा लागेल. नवनवी कौशल्ये मिळवण्यासाठी देशातील शिक्षण पद्धतीही त्या दृष्टीने विकसित केली पाहिजे. म्हणूनच नव्या शैक्षणिक धोरणाचा अवलंब करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचे मोदी म्हणाले.

२०१४ मध्ये देशात १३ आयआयएम होत्या, त्यात सात नव्या संस्थांची भर घालण्यात आली. गेल्या ७० वर्षांमध्ये सात ‘एम्स’ होत्या, आता आणखी आठ एम्स स्थापन झाल्या आहेत वा त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आयआयटींची संख्या १६ वरून २५ वर नेण्यात आली आहे असे त्यांनी स्पष्ट केले.