उत्तर प्रदेशात बलात्काराच्या आरोपाखाली तुरूंगात असलेला समाजवादी पक्षाचे माजी मंत्री गायत्री प्रजापतींच्या कुटुंबीयांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट नाकारली. गायत्री प्रजापतींची पत्नी त्यांच्या दोन मुलींसोबत योगी आदित्यनाथांच्या ५-कालिदास मार्ग या निवासस्थानी आली होती. ती जेव्हा तिथे गेली तेव्हा आदित्यनाथ त्यांच्या ‘जनता दर्शन’ या कार्यक्रमात होते. या कार्यक्रमाद्वारे आदित्यनाथ सामान्य लोकांना भेटून त्यांच्या व्यथा जाणून घेतात.

गायत्री प्रजापतीच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार आदित्यनाथांच्या निवासस्थानी हजर असलेल्या एका मंत्र्याने त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट होईल असं सांगितलं पण ते प्रजापतींच्या कुटुंबीयांना भेटले नाहीत. यावेळी बलात्काराच्या आरोपाखाली तुरूंगात असलेले गायत्री प्रजापती निर्दोष असल्याचा दावा त्याच्या पत्नी आणि मुलीने केला.

एक महिला आणि तिच्या मुलीवर बलात्कार केल्याचा ठपका गायत्री प्रजापतींवर ठेवण्यात आला आहे. गायत्री प्रजापती उत्तर प्रदेशच्या अखिलेश यादवांच्या सरकारमध्ये मंत्री होते आणि पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ते काही काळ फरार झाले होते. उत्तर प्रदेश निवडणुकांचे निकाल लागल्यावर काही दिवसांनी ते परतले होते.

उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर १५ मार्च रोजी गायत्री प्रजापतींना अटक करण्यात आली होती. अटकेआधी अनेक दिवस त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला होता. सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात प्रजापती व इतर सहा जणांवर प्राथमिक माहिती अहवाल दाखल करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. प्रजापती व इतरांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्या अल्पवयीन मुलीवरही बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. समाजवादी पक्ष सत्तेमध्ये होता त्यामुळे त्यांना अटक करण्यात येत नव्हती अशी टीका विरोधकांनी केली होती. निवडणुका संपल्यानंतर त्यांना त्वरित अटक करण्यात आली होती.