अफगाणिस्तानमधील काबूल शहर मंगळवारी बॉम्बस्फोटाच्या आवाजाने हादरले. मध्य काबूलमध्ये अमेरिकी दुतावासाजवळ बॉम्बस्फोट झाला असून या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण जखमी झाले आहेत.

मध्य काबूलमध्ये एका बँकेजवळ मंगळवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार दहाच्या सुमारास स्फोट झाला. बकरी ईदनिमित्त सुरक्षा दलातील जवान बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांना लक्ष्य करण्यासाठीच हा स्फोट घडवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर वझिर अकबर खान या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. बॉम्बस्फोटानंतर परिसरात सुरक्षा दलाचे पथक पोहोचले असून स्फोटात काही इमारतींचे किरकोळ नुकसान झाले. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला तिथून काही अंतरावर अमेरिकी दुतावासही आहे.

गेल्या पाच दिवसात अफगाणिस्तानमध्ये झालेला हा दुसरा बॉम्बस्फोट आहे. हेल्मंड प्रांतात दोन दिवसांपूर्वी कारद्वारे बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. सैन्याच्या ताफ्याला लक्ष्य करण्यासाठी हा स्फोट घडवण्यात आला होता. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला होता.