एकेकाळी ओसामा बिन लादेनचे वर्चस्व असलेल्या अफगाणिस्तानमधील तोराबोराच्या पर्वतरांगेवर आता आयसिसने कब्जा केला आहे. आयसिसने या पर्वत रांगेतून तालिबानला हुसकावून लावले असून आयसिसने कब्जा करताच स्थानिकांनी या भागातून पळ काढायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे तालिबानने आयसिसने कब्जा केल्याचा दावा फेटाळून लावला असून या भागात आयसिससोबत संघर्ष सुरु असल्याचे तालिबानच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

इराक आणि सीरियामध्ये आयसिसची पिछेहाट सुरु असतानाच अफगाणिस्तानमध्ये आयसिसचे वर्चस्व वाढत आहे. अफगाणिस्तानमधील तोराबोरा पर्वतरांगेवर ओसामा बिन लादेनचे वर्चस्व होते. या पर्वतरांगेची सखोल माहिती असल्याने लादेन याच भागात लपून दहशतवादी कारवाया करत होता. लादेननंतर या भागात तालिबानचे वर्चस्व होते. पण आयसिसने आता या पर्वतरांगेवर कब्जा केल्याचा दावा केला आहे. आयसिसच्या रेडिओवर यासंदर्भातील घोषणा करण्यात आली आहे. आयसिसने कब्जा करताच स्थानिकांना घरात राहण्याचे फर्मान काढले आहे. भीतीपोटी स्थानिक नागरिक घर सोडून सुरक्षितस्थळी रवाना होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तोराबोरा पर्वतरांग हा अतिदुर्गम भाग असून या पर्वतरांगेत पोहोचणे कठीण मानले जाते. या भागातील गुहेत लपून लादेनने बरीच वर्ष अमेरिकेला चकवा दिला होता. या भागात आयसिसने कब्जा केल्याने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते. आयसिसने कब्जा मिळवल्यानंतर ते या भागातून उत्पन्नाचा मार्गही शोधून काढतील आणि त्यांचे स्थान आणखी बळकट होईल असे जाणकारांचे मत आहे. आयसिसचे दोन हजारहून अधिक दहशतवादी अफगाणमध्ये सक्रीय असून अफगाण सैन्यासोबतच तालिबानलाही त्यांनी लक्ष्य केले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेनेही आयसिसला लक्ष्य केले असले तरी आयसिसला रोखण्यात अमेरिकेला अद्याप फारसे यश मिळालेले नाही.