रस्त्यावर अपघात झाल्यानंतर जखमी व्यक्तिला तात्काळ वैद्यकीय उपचारांची गरज असते. पण सध्या अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी त्या व्यक्तिचे जखमी अवस्थेतील व्हिडिओ, फोटो व्हॉटसअॅपवर टाकण्यासाठी धावपळ सुरु असते. समाजातील माणूसकी हरवत चालल्याचे हे लक्षण आहे. म्हैसूरच्या नयनदाहाल्ली जंक्शनवर मंगळवारी सकाळी असाच धक्कादायक प्रकार घडला. म्हैसूर रोडवर मदन लाल (३४) यांच्या दुचाकीला अपघात झाला. एका ट्रकने मदन लाल यांच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात मदन लाल यांचे पाय ट्रक खाली आले. मदन लाल यांच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरु होता. ते जखमी अवस्थेत जवळपास २० मिनिट रस्त्यावर पडून होते. यावेळी तिथून जाणारे-येणारे त्यांना मदत करण्याऐवजी मोबाइलवरुन त्यांचे फोटो काढत होते. त्याचवेळी नयनदाहाल्ली जंक्शनवर तैनात असलेला सोमसुंदर हा वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या मदतीला धावून आला. त्याने रस्त्यावरुन जाणारी एक कार थांबवली व मदन लाल यांना नागाराभावी येथील फोर्टीस रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांना मदन लाल यांचा डावा पाया कापावा लागला. मदन लाल राजाराजेश्वरी नगरमध्ये पंचशीला येथे राहतात. ते एका हार्डवेअरच्या दुकानात नोकरीला आहेत. त्यांचा उजवा पाय सुद्धा कापावा लागेल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मदन लाल त्यांच्या दुकानाकडे निघालेले असताना सकाळी ९.३० च्या सुमारास त्यांच्या बाईकला ट्रकने धडक दिली. मदन लाल खाली पडल्यानंतर त्यांचे दोन्ही पाय ट्रक खाली आले. या भीषण अपघातानंतर कोणीही मदन लाल यांच्या मदतीसाठी पुढे आले नाही उलट रस्त्यावरुन येणारे-जाणारे त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डींग करुन फोटो काढत होते. ट्रक ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल झाला असून तो फरार झाला आहे.