भारतीय वन खात्याचे आयएफएस अधिकारी व मॅगसेसे पुरस्कार विजेते संजीव त्रिवेदी यांना बढती मिळाली असून त्यांना संचालक पद देण्यात आले आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी केंद्रीय प्रशासकीय लवादाकडे दाद मागितली होती. चतुर्वेदी यांना गेल्या वर्षी अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राच्या मुख्य दक्षता अधिकारी पदावरून काढण्यात आले होते. त्या संस्थेत राजकीय नेते वैद्यकीय सुविधांचा गैरफायदा घेतात, हे प्रकरण त्यांनी उघडकीस आणले. हरयानातही त्यांना काही पदांवरून काढण्यात आले होते, कारण तेथे त्यांनी भ्रष्टाचार उघडकीला आणला होता. आता शुक्रवारी त्यांना हरयाणा सरकारचे बढतीचे पत्र मिळाले असून त्यांना १ जानेवारी २०१५ पासून उप सचिव पदाऐवजी संचालक पद देण्यात आले आहे. चतुर्वेदी यांनी सांगितले की, आपण कायद्याची लढाई लढलो, पण हे सगळे मिळवण्यासाठी आपल्याला प्रशासकीय लवादाकडे दाद मागावी लागली ही दुर्दैवी बाब आहे. सुनावणीच्यावेळी सरकारला काही उत्तरे देता आली नाहीत त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी बढतीचा आदेश काढला आहे.
चतुर्वेदी हे २००२ च्या तुकडीतील भारतीय वनसेवा अधिकारी असून त्यांना १ जानेवारीलाच पदोन्नती मिळणे अपेक्षित होते, पण त्यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था व हरयाणा या दोन ठिकाणी काम करत असताना भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली होती त्यामुळे त्यांची पदोन्नती रोखली होती. दोन विभागीय खातेनिहाय समित्यांनीही त्यांच्या अर्जाची दखल २७ जानेवारी व १६ जूनच्या बैठकात घेतली नव्हती. त्यांच्या तुकडीतील अनेक अधिकाऱ्यांना मात्र पदोन्नती मिळाली होती. चतुर्वेदी हे सध्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात उपसचिव असून  त्यांनी १९ जूनला लवादाकडे दाद मागितली होती.