हिंदूने चार मुलांना जन्म द्यावा असे विधान करून वाद निर्माण करणारे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांना पक्षाने सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. केलेल्या वादग्रस्त विधानांवरून तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा या नोटीसमधून साक्षी महाराज यांना करण्यात आली आहे.
पक्षाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या आदेशाने साक्षी महाराज यांना नोटीस धाडण्यात आली असून वारंवार वादग्रस्त विधाने करुन पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसेल असे कृत्य तुमच्याकडून का होत आहे याचे येत्या दहा दिवसांत स्पष्टीकरण देण्यास साक्षी महाराज यांना नोटीस बजावून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने साक्षी महाराज यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, “मला जे बोलायचे होते ते मी आधी अगदी स्पष्टपणे बोललो आहे आणि अद्याप मला कोणत्याही प्रकारची नोटीस वैगरे आलेली नाही. जेव्हा येईल तेव्हा बघेन”, असे साक्षी महाराज यांनी म्हटले.
साक्षी महाराज यांनी गेल्या आठवड्यात एका धार्मिक संमेलनात प्रत्येक हिंदूने चार मुलांना जन्म दिला पाहिजे असे अजब विधान केले होते. ‘हम दो हमारा एक’ ही घोषणा स्वीकारली पण या देशद्रोह्य़ांचे त्यानेही समाधान झाले नाही. त्यांनी दुसरी घोषणा काढली ‘हम दो और हमारा..’ त्यांनी मुलीचा मुलीशी व मुलाचा मुलाशी विवाह मान्य केला, गेल्या सरकारने हे केले. त्यामुळे आपण महिलांना चार मुले जन्माला घाला असा सल्ला देत आहोत. त्यातील एक मूल साधूंना द्या, पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत आहेत अशा बातम्या येत आहेत, त्यामुळे दुसऱ्या मुलाला सीमेवर पाठवा, असेही साक्षी महाराज म्हणाले होते. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. याआधीही साक्षी महाराज यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असे विधान करून गदारोळ उडवून दिला होता.