चीनमध्ये अतीवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली असतानाच आता देशाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीला हिगोस वादळाने धडक दिली आहे. त्यामुळे चीनमधील जनतेच्या अडचणींमध्ये अधिक भर पडली आहे. पूर, जमीन खचणे, अतिवृष्टी आणि आता वादळ अशा नैसर्गिक संकटामध्ये स्थानिकांचे प्रचंड हाल झाले असून त्यांना अनेक समस्यांचा समाना करवा लागत आहे. पीपल्स डेली या चीनमधील सरकारी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार यूनान प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने दोन घरे गाडली गेली असून पाच जण बेपत्ता आहेत.

समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या झुहाई शहराला धडक देण्याआधी हिगोस वादळाने हाँगकाँगच्या किनारपट्टी भागामध्ये मोठे नुकसान केलं आहे. गुआंग्डोंग प्रांतातील झुहाई शहराला बुधवारी संध्याकळच्या सुमारास हिगोसचा फटका बसला. मात्र जमिनीला धडकल्यानंतर वादळाची तिव्रता कमी झाली आणि ते गुआंगशी प्रांताकडे वळले.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सिचुआन प्रांतातील यिबीन शहरामध्ये भूस्खलन झाल्याने रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या. यामध्ये २१ वाहने मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. या दुर्घटनेमध्ये कोणाही जखमी झालेलं नाही. पूरमुळे चीनमध्ये २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मागील आठवड्यामध्ये चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर या नैसर्गिक आपत्तीमुळे २५ अरब अमेरिकन डॉलरच्या संपत्तीचे नुकसान झालं आहे.

चिनी प्रसार माध्यमांमधील बातम्यांनुसार ६५ हजारहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आलं आहे. या प्रांतामधील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मासेमारीसाठी समुद्रात केलेल्या बोटींना पुन्हा बोलवण्यात आलं आहे. जोरदार वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. अनेक ठिकाणी विजेच्या तारांवरच झाडं पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला आहे. गुआंग्डोंगमधील मैंजहोउ हा संपूर्ण भाग अंधारात गेल्याची माहिती येथे सेवा पुरवणाऱ्या कंपनीने दिली आहे. सिचुआन प्रांतामध्ये पूराच्या पाण्याचा जोर हळूहळू कमी होताना दिसत आहे. येथील प्रसिद्ध भगवान बुद्धांच्या मुर्तीचे बोटे दिसू लागल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. मागील ७० वर्षांमध्ये पहिल्यांदाच ७१ फूट उंचीच्या या बुद्ध प्रतिमेच्या पायापर्यंत पाणी पोहचले होते.